परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघात (Pathari Vidhan Sabha Election 2024) महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर (Nirmalatai Vitekar) यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर (Nirmalatai Vitekar) यांना तिकीट जाहीर केले आहे. हे तिकीट जाहीर केल्यानंतर राजेश विटेकर यांच्यासमोर शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या बंडाचे मोठ आव्हान निर्माण झाले आहे. कारण सईद खान यांनी विटेकरांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 


तेच ते चेहरे लोकांना नकोसे झाले आहेत


सईद खान यांच्या बंडखोरीवर राजेश विटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सईद खान यांनी टीका केली असली तरी मुख्यमंत्री त्यांना बोलतील आणि त्यांना शांत करतील, असं विटेकर म्हणाले आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात तेच ते चेहरे लोकांना नकोसे झाले आहेत. पक्षात बऱ्याच जणांना विचारल्यानंतर माझ्या आईची उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचेही राजेश विटेकर यांनी सांगितले. 


शब्द फिरवत माझ्या पाठीत खंजीर खुपसला


तर दुसरीकडे सईद खान हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. दोन वर्षांपासून मी पाथरी विधानसभेची तयारी करतोय. मला पक्षाकडूनही शब्द देण्यात आला होता. तसेच राजेश विटेकर जेव्हा विधानपरिषद निवडणूक लढवत होते, तेव्हाही मी त्यांना मदत केली. मला त्यांनी विधानसभेसाठी मदत करणार असल्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांनी अखेरीस शब्द फिरवत माझ्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका सईद खान यांनी केली. 


पाहा व्हिडीओ :



पाथरी या मतदाररसंघात नेमकं काय होणार?


तसेच मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. 29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असं सईद खान यांनी सांगितलं आहे. सईद खान हे शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परभणई जिल्ह्यातील पाथरी या मतदाररसंघात नेमकं काय होणार? महायुतीपुढचा हा पेच नेमका कसा सोडवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा :


आयात उमेदवाराला अजित पवारांकडून तिकीट, आमदार चंद्रिकापुरे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? महायुतीचं टेन्शन वाढलं!


मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा परंड्याचा उमेदवार बदलण्याची शक्यता, मविआत खांदेपालट होणार? राहुल मोटेंची आशा वाढली


शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार