नागपूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election Voting) धामधुमीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत आर्थिक व्यवहार करण्यासाठी बिटकॉन या क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काल (19 नोव्हेंबर) पुरावे म्हणून कथित कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट दाखवले आहेत. यावरच आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.  


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?


नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईनसंदर्भात काही आरोप करण्यात आले आहेत, यावर तुमचं मत काय? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, मीदेखील माध्यमांत हे सर्वकाही पाहिलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की, या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. यात काय खरं आहे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे. कारण आरोप आहेत. अशा प्रकारच्या गंभीर आरोपांवर सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येणं, हा जनेताच अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली. 


नेमकं प्रकरण काय?


सध्या विधानसभा निवडणुकीची धूम चालू असतानाच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी आर्थिक व्यवहारासाठी बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचा, आरोप करण्यात आला आहे. हे आरोप करताना भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्स आमि व्हॉट्सअॅप चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट दाखवले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतक्रिया व्यक्त करण्यात आल्या.


नाना पटोले, सुप्रिया सुळे काय म्हणाले? 


दरम्यान, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.  मला बिटकॉईन हा काय प्रकार आहे, हेच माहिती नाही. विरोधकांना पराभव समोर दिसत आहे. त्यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे, त्यामुळेच तसा आरोप केला जातोय, असं नाना पटोले म्हणाले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीदेखील सर्व आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलंय. 


हेही वाचा :


Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सातारा जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान?


Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल