बारामती: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा (Maharashtra Vidhan Sabha Voting 2024) हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेतदिले. मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी महायुतीला बहुमत मिळण्याचा जो दावा केला होता, त्याची खिल्ली उडवली.
यावेळी शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांना मतदानाचा (Maharashtra Voting 2024) हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा. पण मतदान जरुर करा, असे शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात साधारणत: साधारणत महाराष्ट्रात शांततेत मतदान होते. पण नागपूर जिल्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ला (Anil Deshmukh Attack) झाला, तो अस्वस्थ करणारा होता. महाराष्ट्रात दरवेळी तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडते. पण यंदा तसे घडताना दिसत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
विनोद तावडेंबाबत शरद पवार काय म्हणाले?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातबाबत बोलताना शरद पवार यांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, सदर प्रकरणाबाबत फॅक्चुअल गोष्टी मला नक्की माहिती नाहीत. त्यामुळे मी लगेच त्यावर भाष्य करणार नाही. ज्यांच्यावर आरोप केला जातो, त्यांना मी थोडसं ओळखतो. माझ्याकडे ऑथेटिंक माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video