Sharad Pawar on Bitcoin Scam : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील  (Ravindra Patil) यांच्या आरोपाने खळबळ उडाली. रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा त्याचबरोबर अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काल (मंगळवारी) रात्री पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे दाखवत काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील दाखवले. भाजपाच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्या प्रकरणावर शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया देताना हे आरोप फेटाळले आहेत. 


काय म्हणाले शरद पवार?


'ज्यांनी तक्रार केली आहे, असं म्हणतात मला माहिती नाही, तो अधिकारी तुरुंगात होता. त्यांच्या म्हणण्याची नोंद का घ्यायची. भाजप आणि एकंदरित प्रचार किती खालच्या पातळीचा दिसून येतो' असं शरद पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही तास आधी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र नाथ पाटील यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भाजपवर मानहानीचा खटला भरणार असल्याचंही म्हटलं आहे. 


 'मी भाजपवर मानहानीचा खटला दाखल करणार' - सुप्रिया सुळे 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी जे काही बोलले ते खोटे आहे. माझा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये नाही. एक बनावट ऑडिओ क्लिप आहे. ती तपासून घ्या. रवींद्र पाटील हे आयपीएस अधिकारी आहेत. आम्ही या प्रकरणाशी संबंधित नाही.सुधांशू त्रिवेदी यांना आम्ही फौजदारी मानहानीची नोटीस दिली आहे. मी गौरव मेहता यांना ओळखत नाही. सर्व आरोप खोटे आहेत. सायबर गुन्ह्याबाबत आम्ही ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.


'मतदारांची दिशाभूल केली जात आहे'


सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, बिटकॉइनच्या गैरवापराच्या खोट्या आरोपांविरुद्ध आम्ही भारत निवडणूक आयोग आणि सायबर गुन्हे विभागाकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. 'मतदारांची दिशाभूल केली जात आहे. यामागचा हेतू स्पष्ट आहे, तो निषेधार्ह आहे."