Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता बंडखोरी सुद्धा उफाळून आली आहे. अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना कायम ठेवण्यात आल्याने इच्छुकांची नाराजी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे भाजपचे डोकेदुखी वाढत चालली आहे. सांगलीमध्ये विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीला शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, मुंबईमध्ये भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 14 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून जाहीर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


राज पुरोहितांचा राहुल नार्वेकरांना विरोध?


मात्र त्यांच्या उमेदवारीला माजी आमदार राज पुरोहित यांनी विरोध केला आहे. राज पुरोहित आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे राज पुरोहित बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कट करत भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा याच मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज झालेले राज पुरोहित देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे राज पुरोहित यांची बंडखोरी शांत केली जाणार का? याकडे लक्ष आहे. 


सागर बंगल्यावर नाराजांची गर्दी वाढली! 


दुसरीकडे, आज सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपमधील नाराजांची ये-जा सुरु आहे. खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीरे सुद्धा भेटीला पोहोचले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक बाळा भेगडे हेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी पक्षादेशामुळे माघार घ्यायला लागलेचे मुरजी पटेल हेदेखील आज सकाळी फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. वर्सोवा मतदारसंघ वेट ॲंड वॉचवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या.


सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात


दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजप नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली भाजपात बंडखोरी उफाळली आहे. गेली 10 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलली असून सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी अमान्य करीत मी बंडखोरी करीत असल्याचे केले. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. माधवनगर येथील बैठकीत शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी ही घोषणा केली. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले. शिवाजी डोंगरे यांच्या बंडखोरीमुळे आता सांगली भाजपाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या