Maharashtra NCP Political Crisis : जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता पक्षविरोधी कारवाई केली म्हणून अजित पवार यांनी त्यांच्यावर कारवाई कऱण्यात यावी, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. 


एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. पण ते काम हे विधानसभा अध्यक्षांचे आहे. ज्या विरोधी पक्षाची सर्वात जास्त संख्या असते त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात येते. आता जे काही करण्यात आलं ते आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं जात आहे. 


उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रफुल पटेल यांनी यावेळी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त केल्याचे सांगितले तर सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असल्याची माहितीही दिली. त्याशिवाय यावेळी तटकरे यांनी काही नियुक्त्याही केली.  महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक कांग्रेसपदी सूरज चव्हाण तर प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सूरज चव्हाण... असे सुनिल तटकरे यांनी सांगितले. 


शरद पवारचं पक्षाचे अध्यक्ष - अजित पवार 
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 


रविवारी सुनिल तटकरेंची नेमणूक केली, त्यात काही निर्णय घेतले आहेत ते सांगितलेच. एकाला प्रतोद आणि विरोधी पक्षनेते नेमलेलं आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचं असतं. ज्याची संख्या जास्त असते त्याची नेमणूक करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी त्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार म्हणाले.  


आणखी वाचा :


Maharashtra NCP Political Crisis : जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त, तटकरे नवे अध्यक्ष - प्रफुल पटेल