(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Elections 2024 : पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरांची गर्दी, अजितदादांचे मंत्री तडकाफडकी फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर खलबतं
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यांनतर भाजपमध्ये बंडखोरांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट कुठल्याही क्षणी जागा वाटप जाहीर करू शकते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहेत. त्यातच काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीचे प्रयत्न सुरु असल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. उदगीर आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनी बंडाची तलवार उपसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी मंत्री संजय बनसोडे आणि आमदार आशुतोष काळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
उदगीरमधून किशोर गायकवाडांनी उपसली बंडाची तलवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. संजय बनसोडे यांना अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र या मतदारसंघातून भाजप नेते किशोर गायकवाड यांनी बंडाची तलवार उपसली आहे. यामुळे संजय बनसोडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहे. किशोर गायकवाड यांची देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याची मागणी संजय बनसोडे यांनी केली आहे. तर भाजपचे स्थानिक नेतेही बनसोडेंच्या विरोधात असून उदगीरमध्ये भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टाळण्यासाठी बनसोडे फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दाखल झाले आहेत.
कोपरगावमधून विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार?
तर दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नेते विवेक कोल्हे हे इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे आमदार आहेत. ही जागा अजित पवार गटालाच सुटल्याने विवेक कोल्हे हे बंड करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. विवेक कोल्हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोल्हे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. मात्र अद्याप विवेक कोल्हे यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता आशुतोष काळे हे देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. विवेक कोल्हे यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न आशुतोष काळे यांच्याकडून सुरु आहेत. कोल्हे यांचे बंड थांबवत भाजपकडून मदत मिळण्यासाठी काळे हे फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत. आता दोन्ही मतदारसंघातील बंड रोखण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा