Varsha Gaikwad : स्मार्ट सिटी आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च, मुंबईला बकाल करण्याचं काम सुरु : वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad : जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा मुंबईत होत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर देखील त्यांनी भाष्य केलं.
मुंबई :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची प्रचार सभा मुंबईत सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष, काँग्रेस पार्टीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा मुंबईतील बीकेसीमधील मैदानात सुरु आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या सभेत बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जगातील सर्वात जमीन घोटाळा मुंबईत होत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन देखील त्यांनी टीका केली. मुंबईला वाचवण्याच्या लढाईमध्ये राहुल गांधींना सहभागी व्हावं लागेल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
महाराष्ट्र महिला अत्याचार देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांवरील, मुलींवरील अत्याचारात महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर आहे. रेल्वे दुर्घटनेत दररोज सात लोकं मरतात, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाल्याचं देखील आपण पाहिलं आहे. सामान्य माणसांसाठी रेल्वेची सुविधा नाही, प्लॅटफॉर्म नाही. मुंबईची अवस्था काय करुन ठेवली आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मुंबईला बकाल करण्याचं काम केलं जातंय, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
स्मार्ट सिटी आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मुंबई महापालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून होत नाही. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी तोडण्यात आल्या. मुंबईच्या जागा उद्योगपतींना देण्याचं काम चाललंय, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा मुंबईत पाहायला मिळतोय, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतल्या ठिकठिकाणच्या जागा दिल्या जात असल्याचा आरोप देखील वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबईला वाचवण्याच्या लढाईत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांना सहभागी व्हावं लागेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बदलापूर, नाशिक आणि मुंबईत महिला सुरक्षित नाहीत. 64 हजार महिला बेपत्ता आहेत, याबाबत प्रश्न विचारत आहोत. शक्ती कायदा अडीच वर्ष धूळखात पडलाय. क्रिकेट घेऊन गेले, बॉलिवूड घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सभेला संबोधित केलं. आपण एका लढाईला सामोरं जातोय, एक चीड महाराष्ट्राच्या मनात आहे. ती चीड गद्दारीबद्दल, ती चीड महागाईबद्दल आहे, असं आव्हाड म्हणाले.
इतर बातम्या :