मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा राजधानी नवी दिल्लीत सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी होणार याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. सगळ्या मार्गांचा वापर करुन बंडखोरी रोखा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात महायुतीतील नेत्यांनीच बंडाचा झेंडा फडकावला असल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या पैठण, नांदगाव आणि जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालंय. जालन्यात अर्जुन खोतकर रिंगणात आहेत. नांदगावमध्ये सुहास कांदे तर पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे रिंगणात आहेत. या तीन नेत्यांविरुद्ध अनुक्रमे भास्कर दानवे, समीर भुजबळ आणि डॉ. सुनील शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
पैठणमध्ये विलास भुमरेंविरोधात सुनील शिंदे रिंगणात
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. पैठण मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. यापूर्वी पैठण मतदार संघामध्ये विद्यमान खासदार संदिपान भुमरे हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर यावेळी शिवसेनेकडून त्यांना लोकसभेत जागा देण्यात आली असल्याने पैठण मतदार संघ हा त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना जागा सोडण्यात आली आहे. मात्र, संदिपान भुमरे यांना खासदार करण्यामध्ये भाजपाची मोठी साथ होती.त्यामुळे पैठण मतदारसंघ हा भाजपाला सोडण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु, महायुतीमध्ये शिवसेनेला ही जागा सुटली असल्यानं आता भाजपमध्ये बंड झालं असून महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या विरोधात डॉ. सुनील शिंदे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जालन्यातून रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवेंचा अपक्ष अर्ज
जालन्यात महायुती मध्ये बंडखोरी पाहायला मिळत असून शिवसेनेकडून अर्जून खोतकरांचे नाव जाहीर झाले असताना, भाजपकडून रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भास्कर दानवे हे भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.. जालन्याची जागा ही महायुतीत भाजपला सोडण्यात यावी यासाठी दानवे आग्रही होते.मात्र, ही जागा परंपरागत शिवसेनेकडे असल्यानं खोतकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले भास्कर दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज भरायला आणखी चार दिवस बाकी असून अजूनही भाजप ला ही जागा सोडतील अशी आशा भास्कर दानवे यांनी व्यक्त केली आहे.
नांदगावमध्ये समीर भुजबळ रिंगणात
नांदगावमध्ये शिवसेनेकडून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भयमुक्त नांदगावसाठी निवडणूक लढवत असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. समीर भुजबळ यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला आहे.
इतर बातम्या :