Sudhir Salvi on Ajay Chaudhari : अजय चौधरींच्या (Ajay Chaudhari) उमेदवारीनंतर सुधीर साळवींनी (Sudhir Salvi) एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार.' त्यामुळे जरी पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने अजय चौधरींना संधी देण्यात आली असली तरी सुधीर साळवी हे देखील पक्षासाठीच काम करणार असल्याचं चित्र आता आहे. त्यामुळे लालबाग-परळमध्ये ठाकरेंचीच मशाल धगधगती राहणार का याची उत्सुकता आहे.
शिवडी विधानसभेचा पेच अखेर सुटला असून विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पक्ष पुन्हा एकदा संधी देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघासाठी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय दिला. यावेळी अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही उपस्थित होते. पण अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतल्यानंतर सुधीर साळवी उद्धव ठाकरेंना नमस्कार करुन बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?
संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरेंचे हे शब्द ऐकून सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले. दरम्यान सुधीर साळवी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार आहे.
अजय चौधरींच्या एकनिष्ठेचं फळ
शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे.
शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना होता पाठिंबा
शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे मातोश्रीनेही आता अजय चौधरींच्याच नावावर शिक्कामोर्तब केलंय दरम्यान शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.