मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीचं जागा वाटप, जागांची अदलाबदली, राहुल गांधी यांच्या नाराजीच्या चर्चा, महायुतीच्या जागा वाटपाच्या दिल्लीतील बैठका या मुद्यावंर  संजय राऊत यांनी भाष्य केलं. मविआच्या जागा वाटपासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा उल्लेख केला. ते म्हणाले आम्ही कोरेगावची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली, त्या बदल्यात साताऱ्याची जागा घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 


मविआच्या जागावाटपावर संजय राऊत म्हणाले, तीन पक्षांनी मिळून, बसून बारा-बारा तास चर्चा करून यादी जाहीर केली आहे त्यामुळे नाराजी कुठेही नाही.  तिढा असणारचं, तीन पक्ष सोबत आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात, असंही त्यांनी म्हटलं.  दोन पक्ष असल्यावर ठीक, पण तीन पक्ष असल्यावर प्रत्येकाला वाटत आपणच जागा जिंकणार,  महाविकास आघाडीत जागा वाटप करणे इतकं सोप्प नसतं, असं संजय राऊत म्हणाले. 


परांडा हा सेनेचा मतदार संघ आहे, तिथे आमचा आमदार निवडून आलेला आहे, अर्ज दाखल करण्याची तारीख 29 ऑक्टोबर तर मागं घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे. आम्ही तोपर्यंत निर्णय घेऊ शकतो, असंही संजय राऊत म्हणाले. 


नाना पटोले यांनी पत्र लिहिल्यासंदर्भात विचारलं असता राऊत यांनी पत्र काँग्रेसने लिहिलं म्हणजे ते काही लेटरबॉम्ब नाही, आम्ही सुद्धा पत्र देतो. पत्र तुम्ही नीट पाहा त्यात लिहिलंय या जागा आम्हाला पाहिजे आहेत, असं राऊत म्हणाले. 


राहुल गांधी नाराज होणारा माणूस नाही, ते राष्ट्रीय मुद्यावर नाराज होतात. जागा वाटपावर ते नाराज होणार नाहीत. आम्ही सुद्धा राहुल गांधी यांच्या संपर्कात असतो. त्यांच्या बैठकामध्ये चर्चा होतं असेल, ही जागा हवी आहे ती जागा हवी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  


उमेदवारांची यादी एडिट करावी लागेल त्यात गंभीर काय? कोरेगाव मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादीला देतोय. सातारा मतदार संघ आम्ही घेतला  कोरेगावात राष्ट्रवादीकडे शशिकांत शिंदे चांगले उमेदवार आहेत. ती जागा आमच्याकडे होती ती त्यांना देतोय, असं संजय राऊत म्हणाले.  


जागा वाटप करायला शिवसेना कधीच दिल्लीत गेली नाही. शिंदे अजूनही अमित शाह यांना भेटायला हिरवळीवर जाऊन बसतात 
त्यांना जागा घ्यायला उठाबश्या काढव्या लागतात, असा टोला राऊत यांनी लगावला. 


दिल्लीत आम्ही जागा वाटप करायला गेलो नव्हतो, दिल्ली काय त्यांची जहागीर आहे का? शिवसेना ज्यांनी तोडली, त्यांनी शिवसेनेची चिंता करू नये. आम्ही तीन पक्ष मिळून महाराष्ट्र मध्ये मोदी सरकार ला रोखलं त्यांच्या पोटात दुखतंय, असंही राऊत म्हणाले.  


दरम्यान, संजय राऊत यांनी कोरेगावच्या बदल्यात साताऱ्याची जागा घेतल्याचं सांगितलं. आता साताऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. साताऱ्यातून सचिन मोहिते, एस. एस. पार्टे यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय अमित कदम यांचं देखील नाव चर्चेत होतं. 


इतर बातम्या : 


BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?


बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर