BJP second list: मुंबई : महायुतीकडून भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्याने भाजपच्या (BJP) एकूण उमेदवारांची संख्या 121 झाली आहे. त्यामध्ये, मुंबईतील एकही उमेदवार जाहीर करण्यात आला नसून पुण्यातून तीन उमेदवारांची घोषणा झाली आहे. दुसरीकडे विदर्भातील 9 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आलंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) (NCP) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. त्यात 45 नावे होती. त्यानंतर, आज जयंत पाटलांकडून 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तर, काँग्रेसनेही पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी 23 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून आज आणखी 3 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उर्वरीत उमेदवारांची यादीही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
भाजपने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यामुळे अद्यापही भाजपच्या 25 ते 30 उमेदवारांची घोषणा बाकी आहे. कारण, भाजपकडून 150 ते 153 जागांवर उमेदवार देण्यात येत असल्याचे समजते. मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीची वैशिष्टे काय हे पाहुयात. भाजपने आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतील वैशिष्टे खालीलप्रमाणे.
भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे
1) भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकाही उमेदवाराचे नाही नाही.
2) अकोला पश्चिममध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जागी विजय अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे.
3) अकोटमध्ये विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळेवर भाजपने पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
४) गडचिरोलीमध्ये भाजपने विद्यमान आमदार देवराव होळी यांना डच्चू देत डॉ.मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे.
५) राजुरा मतदारसंघात भाजपने देवराव भोंगळे या नवीन चेहऱ्याला मैदानात उतरविले आहे.
६) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीची जागा भाजपने शिवसेनेकडून आपल्याकडे घेतली आहे, त्या ठिकाणी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे...
७) वरोरा मतदारसंघ ही भाजपने शिवसेनेकडून आपल्याकडे घेतला असून त्या ठिकाणी करण देवतळे यांना संधी देण्यात आली आहे. (2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर संजय देवतळे निवडणुकीच्या मैदानात होते)
8) भाजपने या यादीत वाशिममध्ये विद्यमान आमदार लखन मलिक यांचं तिकीट कापत नवीन चेहरा असलेल्या शाम खोडे यांना संधी दिली आहे.
9) मेळघाट मतदारसंघात केवलराम काळे यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मेळघाटमध्ये प्रहारचे राजकुमार पटेल आमदार होते काही दिवसांपूर्वी राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकनाथ शिंदेंकडून त्यांना दाद मिळाली नव्हती. मतदार संघ भाजपकडे असल्याने तेव्हा शिंदेंनी विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांना पक्षात प्रवेश दिला नाही आणि अखेरीस जागा भाजपकडेच गेली.
10) सोलापूर शहर मध्य मध्ये भाजप कडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोलापूर शहर मध्य हा परंपरागत शिवसेनेचा होता मतदारसंघ, मात्र जागा वाटपात यावेळेस ही जागा भाजपला सुटली.