Nana Patole: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं असून राजकीय वर्तुळात घटनांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ही चर्चा सरत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या असून महाविकास आघाडी कडून बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार का असे विचारल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं सांगत ही चर्चा थांबवली पाहिजे असं सांगितलं.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना टोले लगावले. चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री पदाचे नाव सांगितले का? असा सवाल करत या डाकू लोकांची भूमिका आता दिसत आहे असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले नाना पटोले?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणत्या पक्षाचा असणार याची एकच चर्चा सुरू आहे. नुकताच महाविकास आघाडीचा विधानसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीचा मुख्यमंत्री की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही चर्चा व्यर्थ असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मला वाटतं आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा नाही. राज्याला वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही एकमेकांसोबत काम करत आहोत. लोकांमधून आमदार निवडून आल्यानंतर हे ठरतं. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची चर्चा थांबवली पाहिजे. असं पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री महायुतीचा की महाविकास आघाडीचा?
महायुतीमध्ये काय सुरू आहे हे चंद्रकांत पाटलांनाच माहिती आहे. त्यांचा महायुती दरबार दिल्लीत गेला आहे. या आघाडीमध्ये शेवटपर्यंत चर्चा करून वाटाघाटीतून प्रश्न सुटतील. चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री पदाचे नाव सांगितलं का? हे डाकू लोक आहेत. भाजप आता म्हणत आहे आमचं सरकार येणार. मुख्यमंत्री महायुतीचा होणार. त्यामुळे आत्ता यांची भूमिका दिसत आहे. अजून काहीच ठरलं नाही मतदान नाही जनतेच्या मतावर डाका टाकू असं तर मत नाही ना..चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय.. असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारी अर्जवरून भाजपला कानपिचक्या घेतल्याचं दिसलं. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत काय सुरू आहे ना हे माहिती आहे तुम्हाला, आमच्याकडेच का लक्ष देत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडीचा जागावाटप उद्या जाहीर करू
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 85- 85- 85 अशा 270 जागांवर एकमत झाल्याची माहिती काल संजय राऊत यांनी दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना यादी काही वेळात पाठवत आहे थोड्या वेळात जागा वाटपाचा प्रश्न सुटेल. अर्ज भरू द्या काँग्रेस यादी उद्या सकाळपर्यंत जाहीर करू असं देखील पटोले म्हणाले.