Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर लक्ष ठेवून असणाऱ्या मनोज जरांगे यांनी एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना एका जातीवर निवडणूक न लढवता सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार असल्याचे म्हणालेत. त्यामुळे ऐन विधानसभेच्या ताेंडावर मनोज जरांगे कोणते राजकीय गणित जुळवतात याकडे साऱ्यांचाच लक्ष आहे. जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.


दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच विधानसभेचे अर्ज भरावेत अशा सूचना केल्यानंतर एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार असं जरांगेंनी म्हणल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


काय म्हणाले मनोज जरांगे? 


काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता एकच उमेदवार दिल्यावाचून पर्याय नाही असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. प्रत्येकालाच उभं राहायचं आहे. त्यामुळे मी सर्वांना बोलून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर मी नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं जरांगे म्हणालेत. दरम्यान आज, जरांगे उमेदवार जाहीर करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.. ते म्हणाले, सर्वांना हात जोडून विनंती करणार एकच जण उभे रहा.. किती मतदारसंघ काढायचे हे आज जाहीर करायचे नाही. 


कधी करणार उमेदवार जाहीर? 


प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. 


कोणाशी जुळवणार राजकीय समिकरण?


आधी मराठा आरक्षणाची मागणी, नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर मराठा उमेदवार, पाडापाडीचं गणित अशी सलग वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे यांनी एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समिकरण जुळवणार असं वक्तव्य केलंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता मोजून ४ दिवस शिल्लक असताना राजकीय समिकरण जुळवून कोणत्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करायची हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना ठरवायचं आहे. त्यासाठी सुरवातीला संभाजीनगर जिल्हातील इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे.. या बैठकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा रहावा या साठी मनोज जरांगे मार्गदर्शन करतील. असं त्यांनी सांगितलं आहे. 25 ते 27 या काळात मी राजकीय समिकरण जुळवेल. असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. 


विधानसभेपूर्वी मनोज जरांगे संभ्रमात?


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभेची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अनेक अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची बैठक घेत लढायचं की पाडायचं हे त्यांनी ठरवलं होतं. काही ठराविक मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचेही त्यांनी सांगितलं होतं. कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे हे पुढच्या बैठकीत ठरवू असंही ते म्हणाले होते. 24 ऑक्टोबरला म्हणजे आज इच्छुकांची अंतरवली सराटीत बैठक आहे. पण आज उमेदवार जाहीर न करण्याचं त्यांनी सांगितलं. 29 ते 30 तारखेला मतदार संघ जाहीर करून उमेदवार जाहीर करू असेही ते म्हणालेत.  एकाच वेळी ते मतदारसंघ निहाय उमेदवार जाहीर करण्याचाही सांगतायत. तर दुसरीकडे एकच उमेदवार ठरवण्याचं आज फायनल करू असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे हेच संभ्रमात असल्याची चर्चा सुरु आहे.