ठाणे : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती शिंदे गटाचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपच्या स्नेहा पाटील यांच्या काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील गोदामांवर एमएमआरडीए प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी उशिरा कारवाईचा घाट घातला होता.ही कारवाई करत असताना संबंधित अधिकाऱ्याने कोणती ही नोटीस बजावलेली नव्हती असा आरोप स्नेहा पाटील यांनी केला आहे. मी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर प्रशासनाकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असून मी एक भूमिपुत्र महिला विधानसभा निवडणुकीत लढत असताना एमएमआरडीए प्रशासनाकडून होत असलेली कारवाई चुकीची आहे असा आरोप स्नेहा पाटील यांनी केला आहे.
आचारसंहिता सुरू असताना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न बजावता एमएमआरडीए कारवाई करतातच कसे असा प्रश्न स्नेहा पाटील यांनी उपस्थित केला आहे.आमच्या वडिलोपार्जित जमिनी वरील ही तीन गोदाम 1999 मध्ये बनवण्यात आलेली असून त्यावेळेस एमएमआरडीए प्रशासनाचे हे कार्यक्षेत्र नव्हते. 2009 मध्ये भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रात केल्या नंतर त्यांची परवानगी घेण्यास सुरुवात झाली.असे असताना परवानगी घेऊन बांधलेल्या गोदामां वर ही कारवाई सूडबुद्धीने होत असून तालुक्यात कोणत्याही भूमिपुत्रांच्या गोदामांवर अशी कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर तेथे एक भूमिपुत्र महिला म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा इशारा स्नेहा पाटील यांनी दिला आहे.परंतु ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे का असा प्रश्न वारंवार विचारल्यानंतर ही त्यांनी कोणाचेही नाव न घेता या कारवाईचे खापर फक्त एमएमआरडीए प्रशासनावर फोडले आहे.
एमएमआरडीएची भूमिका
ही अचानक होणारी कारवाई नसून या संदर्भात एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली होती.त्यानंतर या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई होत आहे.एमएमआरडीए अनधिकृत बांधकामांवर अशा कारवाया करतच असते ,त्यासाठी अशा बांधकामांना नोटीस देऊन ही कारवाई होत असते.त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो आहोत, या विभागाचे अधिकारी प्रफुल्ल कांबले यांनी म्हटलं.
दरम्यान, काल्हेर गावातील संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी कारवाईस विरोध केल्यानंतर एमएमआरडीएचे पथक रिकाम्या हाती परतले.
इतर बातम्या :