धुळे : रोजगार हमी, पर्यटन विकास, अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघ. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गडी आणि मढी ही या मतदारसंघाची राजकारणाची केंद्र. दोन कट्टर विरोधकांचा वाढदिवस एकाच दिवशी असणारा हा मतदारसंघ .

या मतदारसंघात आघाडीच्या काळात डॉ. हेमंत देशमुख यांना मंत्रिपद मिळालं होतं तर युतीच्या काळात जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. मात्र तालुक्याला दोन वेळा मंत्रिपद मिळूनही शिंदखेडा मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात फारसं यश आलं नसल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील औष्णिक वीज प्रकल्प, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या हे या मतदारसंघातील मुख्य समस्या.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 162 गावांचा समावेश होतो. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये फेररचना झाली. धुळे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात हा मतदारसंघ येतो. पूर्वी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा आणि नंदुबार जिल्ह्यातील शहादा असा मतदारसंघ होता. या शहादा-दोंडाईचा मतदारसंघात 54 गावांचा समावेश होता तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सोनगीर सर्कलमधील काही गावांचा समावेश होता. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शहादा-दोंडाईचा असा मतदारसंघ न राहता आता फक्त शिंदखेडा मतदारसंघ आहे.

ही फेररचना कदाचित भाजपचे विद्यमान आमदार तथा मंत्री जयकुमार रावल यांना लकी ठरली. 2009 पासून ते आजतागायत जयकुमार रावल हेच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघासाठी एव्हाना संपूर्ण धुळे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात 2009 मध्ये जयकुमार रावल यांनी एंट्री करत आघाडीला धक्का दिला. पुढे 2014 मध्ये रावल यांनी आपले कट्टर विरोधक हेमंत देशमुख यांचा पराभव केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा देखील रावल यांनी पराभव केला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत  कोणाला किती मतं?

1. जयकुमार रावल (भाजप) -  92 हजार 764

2. संदीप बेडसे  (राष्ट्रवादी काँग्रेस) - 50 हजार 636

3. श्यामकांत सनेर (काँग्रेस) - 48 हजार 25

4. राजेंद्रसिंग गिरासे (शिवसेना) - 2 हजार 263

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून कोणाला किती मतं?

1. डॉ . सुभाष भामरे (भाजप) - 1 लाख 13 हजार 667

2. कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) -60 हजार 78

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या

पुरुष मतदार - 1 लाख 61 हजार 518

स्त्री मतदार - 1 लाख 55 हजार 440

यंदाच्या निवडणुकीत यांची नांव चर्चेत -
2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढल्याने आघाडी आणि युतीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडी आणि युती असली तरी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जुही देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादीतर्फे संदीप बेडसे, शिवसेनेतर्फे हेमंत साळुंखे, शानभाऊ सोनवणे यांची नांव चर्चेत आहेत. भाजपतर्फे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनाच उमेदवारी आहे.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल यांची हॅटट्रिक होण्यासाठी, इथे झालेली आणि प्रस्तावित असलेली काही कामं पुरेशी बोलकी असल्याचं भाजपचे कार्यकर्ते सांगतात. त्यात प्रामुख्याने :-

1. शिंदखेडा शहराचा, दोंडाईचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न रावल यांनी मार्गी लावला.

2. दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालय कार्यान्वित केलं.

3. सुलवाडे-जामफळ सिंचन योजना

4. शिंदखेडा तालुक्यात रोजगार हमीच्या माध्यमातून तब्बल 5 हजार विहिरी खोदण्यात आल्या.

5. तापी काठावरील 22 उपसा योजना

6. बुराई नदी बारमाही योजना .

उपरोक्त कामं जयकुमार रावल यांच्यासाठी 2019 च्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी पुरेशी ठरतील आणि जयकुमार रावल हॅटट्रिक करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या निवडणुकीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील युवक कोणाला कौल देतात हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल .