"भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे. चार दिवसांनी सरकारला जाग आली आहे. यात्रा आणि पक्षप्रवेशामधून त्यांना वेळ नाही. भाजपला जनतेशी काही देणं घेणं नाही. भाजप काय, शिवसेना काय, दोन्ही पक्ष राजकारण करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा," असं राज ठाकरे म्हणाले.
जागांचा अंदाज येतो, मग पावसाचा येत नाही?
"चंद्रकांत पाटील काल म्हणाले की, पाऊस किती पडेल आणि पाणी भरेल याचा अंदाज नव्हता. अशा परिस्थितीत तुम्हाला 220-225 आकड्यांचा अंदाज येतो, आमदार निवडून येण्याचा अंदाज येतो. मग एवढा पाऊस पडतो, पाणी भरतंय याचा अंदाज येत नाही," असा उपहासात्मक प्रश्नही राज यांनी विचारला.
सरकारला यात्रा, राजकारणातून वेळ मिळत नाही
"पूरपरिस्थिती पहिल्यांदा भारतीय लष्कराने हाताळायला हवी होती. परंतु यांच्या यात्रा सुरु होत्या, राजकारणातून वेळ मिळत नव्हता. चार दिवसांनंतर तिथे जाता. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसतील, फक्त राजकारण करत बसायचं, मग यात्रा, पक्षप्रवेश करायचे, यातच त्याचा वेळ जात आहे. त्यामुळे कोण जगलं काय, कोण मेलं काय त्यांना काहीच फरक पडत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका पुढे ढकला
राज ठाकरे म्हणाले की, "दोन दिवसांनी पाणी ओसरेल, रोगराई पसरेल. परिस्थिती स्थिरस्थावर व्हायला अजून वेळ लागेल. दोन-चार दिवसात होणार नाही. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लावणार, मग मदतीसाठी सरकार हात वर करणार. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे असं मला वाटतं. त्या पुढील वर्षी घ्या. संपूर्ण लक्ष कोल्हापूर, सांगलीसह आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. आपल्याकडे एका पुतळ्यावर तीन हजार कोटी खर्च होतात, लोकांना वाचवण्यासाठी मदत होत नाही, तर काय उपयोग?
आज राज्यात एवढा विरोधाभास आहे की, अनेक ठिकाणी पाऊस नाही आणि दुसरीकडे पाऊस आहे तर पूर आला आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घ्यायच्या हे योग्य नाही, माणुसकीला धरुन नाही. त्यामुळे सरकारने निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत आवश्यत आहे. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करावा."
राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद