कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांमधील विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पूरग्रस्तांना युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. मात्र या बिकट परिस्थितीत कुणीही राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्र परिषदेत बोलत होते. विरोधकांनी काही चुका होत असले तर लक्षात आणून द्याव्या. ते लोकांत गेले असताना मला राजकारण होताना दिसून आले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


यावेळी राज ठाकरे यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारकडे नसतो. निवडणूक आयोग त्यावर नक्की विचार करेल. यावेळी मदत करताना कुणी कुणाचेही फोटो लावून मदत देऊ नये, असेही ते म्हणाले.

आलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी बोलणे चालू आहे. कर्नाटक सरकारची आपल्याला मदत मिळत आहे. दोन्ही सरकारमध्ये समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सांगलीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने स्थिती बिकट झाली. पूर काळात सांगलीत 93 बोटी काम करत होत्या. सांगलीत 101 गावातून 21 हजार 500 कुटूंब आणि 1 लाख 43 हजार लोक विस्थापित आहेत. तर ब्रम्हनाळमध्ये 12 लोक मृत्यमुखी पडली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत  

या पुरात मृत पावलेल्यांच्या मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा  फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच जनावरं गमावलेल्या आणि जमिनीचे नुकसान झालेल्यांना देखील मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. ही मदत देताना कमीत कमी पुराव्याच्या आधारे दिली जाणार  आहे, असेही ते म्हणाले.  आधी सात दिवस ज्या भागात पाणी होतं तिथं मदत करावी असा जीआर होता, तो आम्ही दोन दिवसावर आणला आहे, मात्र त्यातही गरजेनुसार मदत करण्याच्यासूचना केल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुरग्रस्तांना 10 हजार आणि 15 हजार मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व रक्कम कॅशमध्ये देण्याचं शक्य नाही मात्र गरजेनुसार पैसे देण्याचे आदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले. सरकारने पूरग्रस्तांसाठी 153 कोटी रुपये दिले आहेत. या आपदेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला पाच लाख, अपंगत्व आलेल्यांना दोन लाख तर ज्यांचे घर पडले आहे त्यांना एक लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.  तर शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टरी 13 हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या आपत्तीमध्ये 12 लोकं  मृत्यूमुखी पडले असून 8 जण बेपत्ता तर दोनजण जखमी आहेत. तर 27 हजार 467 एकर जमिनीवरील पिक नष्ट झाले आहे. पुरामुळे  484 किलोमिटरचे रस्ते खराब झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- 27 हजार 467 हेक्टर जमीन पीक नष्ट झाली
- विद्युत विभागाचे 2,615 रोहित्र खराब
- 306 छावणीमध्ये लोक स्थलांतरीत
- यापूर्वी 2-4 हजार मदत मिळत होती, आता 12 ते 15 हजार देत आहोत
- पाणी आता ओसरत आहे, पुढचे रिलीफ ऑपरेशन सुरू असून 100 डॉक्टरांची टीम पोहोचेल
- 13 हजार प्रति हेक्टर शेतातील गाळ काढण्यासठी दिले जातील
- आकस्मित निधीतून निधी उपलब्ध करून देत असून निधी कमी पडू देणार नाही
- मदत करणाऱ्यांनी गावं दत्तक घ्यावीत
- सिद्धीविनायक, शिर्डी, पंढरपूर संस्थन, आर्ट ऑफ लिव्हिग आशा अनेक संस्था मदत करणार आहेत
- आलमट्टीबाबत कर्नाटकशी बोलणे चालू
- 4 लाख च्या वर विसर्ग सुरू होतो, असे कर्नाटक cm म्हणाले