वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदार संघ म्हणून राजकारणात नेहमी वजन राहीलं आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचे रिसोड मधून सूत्र हलविले जाते.


1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मतदारसंघ हा गोवर्धना मतदार संघ म्हणून ओळखला जायचा. 1962 च्या निवडणुकीमध्ये गोवर्धना मतदारसंघ हा एससी जाती करता राखीव होता. मात्र 1967 मध्ये या मतदारसंघाची फेर रचना झाल्याने हा मतदारसंघ मेडशी विधानसभा मतदारसंघ या नवीन नावाने ओळखल्या गेला या मतदार संघावर कायमच कॉंग्रेस ने आपल वजन कायम ठेवत आपला ठसा उमटवला.

1998 ते 2004 आणि 2004 ते 2009 पर्यंत फक्त दोन वेळा या मतदार संघातून भाजपचे अ‍ॅड. विजय जाधव विजयी झाले. या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकाविता आला. हे दहा वर्ष वगळता या मतदारसंघावर सुरवातीपासूनच झनक घराण्याचं कायम वर्चस्व असल्याने रामाराव झनक, सुभाष झनक आणि विद्यमान आमदार अमित झनक या तीन पिढ्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.

2009 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांच्या फेररचना करण्यात आल्या. त्यामध्ये मेडशी मतदार संघाचे रुपांतर रिसोड मतदार संघामध्ये करण्यात आले. सलग दोन वेळा भाजपकडे असलेला हा मतदार संघ भाजपच्या ताब्यातून कॉंग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला.

रिसोड हा विधानसभा मतदार संघ म्हणजे खासदाराचं जन्मस्थान. कॉंग्रेसचे अनंतराव देशमुख, शिवसेनेचे स्व : पुंडलिकराव गवळी आणि त्यांच्या कन्या आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे सलग 5 वेळा नेतृत्व करणाऱ्या विद्यमान खासदार भावना गवळी या खासदारांच जन्मस्थानही रिसोड विधानसभा मतदार संघ आहे.

जिल्ह्यातील राजकारणात कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक परिवार हे तसे दोन्ही परिवार कॉंग्रेसचे कट्टर मात्र या दोन्ही परिवाराचे साप-मुंगसाचे वैर जगजाहीर आहे. हे वैर 2009 च्या निवडणुकीत मतदारांना पाहायला मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसशी बंडखोरी करत अनंतराव देशमुख यांनी कॉंग्रेस ला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर 2014 च्या निवडणुकीत सुद्धा कॉंग्रेसच्या देशमुख घराण्याने भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार करून कॉंग्रेसला पुन्हा सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यातही अपयशच आले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मतं?
सुभाष झनक (काँग्रेस) : 51 हजार 234
अनंतराव देशमुख (अपक्ष) : 48 हजार 194

विजयानंतर अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सुभाष झनक यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ते महिला बालकल्याणच्या रूपाने मात्र आदर्श घोटाळयामध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं तेव्हा सुभाष झनक यांना मंत्रीपदावरून कमी करण्यात आले. 2013 मध्ये सुभाष झनक यांचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. यावेळी देशभरात मोदी लाट वाहत असताना सुद्धा कॉंग्रेसचे अमित झनक यांनी विजय मिळवला.

2014 च्या विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदानाची आकडेवारी
अमित झनक(काँग्रेस) : 70 हजार 939
विजयराव जाधव : 52 हजार 231

स्व. सुभाषराव झनक यांची बळीराजासोबत जुळलेली नाळ या पोट निवडणुकीत अमित झानकांच्या विजयाचे कारण ठरले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अमित झनक यांची लोकप्रियता नसताना युती न झाल्यामुळे भाजप शिवसेना या दोन पक्षामधील मतविभाजनामुळे विजयाची माळ अमित झनक यांच्या गळ्यात पडून कॉंग्रेसने हा गड कायम ठेवला.

कायम सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाचा हा गड विकासात्मकदृष्ट्या अजूनही मागासलेलाच आहे.

2019 च्या निवडणुकीचे काल्पनिक चित्र पाहिले तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या तिकिटावर लाढण्यासाठी बरेच उमेदवारे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर कॉंग्रेस कडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार यांनी निवणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन त्यांचे चिरंजीव नकुल देशमुख यांचा चेहरा समोर करत आहेत. मात्र नकुल देशमुख यांना मतदारांनी कायम नापसंती दर्शविली आहे. कारण त्यांना साध्या नगर परिषद निवडणुकीत सुद्धा पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे हे सुद्धा या मतदार संघावर आपल्या जागेचा दावा करत आहेत. मात्र या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वामन सानप आणि प्रशांत गोळे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. वंचितला मिळणारे मतदान इथे निर्णायक ठरणार आहे.