1976 च्या आधीपासून ते या क्षेत्रात होते. म्हणजे ते संगीत द्यायचे, गाणी बनवायचे, पण ती तितकी प्रसिद्ध नाही झालीत. पण "कभी कभी" आला आणि मग सगळंच बदललं. कभी कभीची गाणी त्यांना वरच्या लेव्हलच्या संगीतकारांमध्ये मध्ये घेऊन गेली. ते तर आधीपासूनच होते पण, हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती आणि ती कभी कभीच्या गाण्यांनी मिळवून दिली. कभी कभी नंतर त्यांच्याकडे ऑफर्स प्रचंड आल्या पण तरीही त्यांनी दर्जेदार कामाला पसंती दिली. "उमराव जान"च्या गाण्यांनी लोकांना वेडं केलं. उमराव जानबद्दल एक सांगितलं जातं ते म्हणजे पाकिजा आणि उमराव जानची तुलना होणार हे लक्षात आल्यावर त्यांनी लता मंगेशकर यांच्याऐवजी आशा भोसले यांच्याकडून सर्व गाणी गाऊन घेतली. पुढे पुन्हा "बाजार", "नुरी"साठी लता मंगेशकर यांच्याकडूनच त्यांनी गाणी गाऊन घेतली.
आणखीन एक गोष्ट म्हणजे एक प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता. खय्याम साहब एकाच प्रकारची, एकाच ठेवणीतली आणि एकाच वर्गाला आकर्षित करणारी गाणी बनवतात असा तो ठपका होता. लोकांच्या या आरोपावर खय्याम साहेबांनी "त्रिशूल" मधल्या गाण्यांनी उत्तर दिलं. त्यात "मौसम मौसम लव्हली मौसम" हे गाणं असो किंवा "मोहब्बत बडे काम की चीज है" हे गाणं असो, सगळी गाणी त्यांच्या आधीच्या कामापेक्षा पूर्ण वेगळी होती. पण म्हणून लोकांना जे वाटतं तसं संगीत ते देत बसले नाहीत. कारण त्यानंतर "उमराव जान" आला "बाजार" आला "नुरी" आला "राजिया सुलतान" आला... आणि हे सर्व चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतले त्यांना आवडलेले सगळ्यात महत्त्वाचे चित्रपट आहेत, कारण ते त्यांच्या स्वतःच्या शैलीतले आहेत.
खय्याम साहेबांनी एकापेक्षा एक अविट गोड गाणी बनवली. त्यांनी राज कपूरच्या एका चित्रपटाला संगीत दिलंय, राजेश खन्नांच्या पहिल्याच "आखरी खत" या चित्रपटाला पण खय्याम साहेबांचं संगीत होतं. पण यश चोप्रांनी साहिर लुधियानवी यांच्या एका कवितेवरुन "कभी कभी" हा चित्रपट बनवायचं ठरवलं आणि इतर कोणाला या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून न घेता खय्याम साहेबांना त्यांनी घेतलं. इथे पण जर आधीचा ट्रेंड बघितला तर अमिताभ बच्चन यांच्यासाठी किशोर कुमार यांचा आवाज घेतला जायचा, पण आपल्या सवयीनुसार प्रवाहाच्या विरुद्ध जात मुकेश यांचा आवाज खय्याम साहेबांनी अमिताभला दिला. आणि ही सर्व गाणी अजरामर झाली. तसा मी पंचमदा आणि गुलजार या जोडगोळीचा फॅन आहे. पण "थोडीसी बेवफाई" मधली गाणी ऐकल्यावर मी काही काळ विसरतो की नक्की कोणाचा फॅन जास्त आहे. "आखो में हमने आपके सपने सजाये है" या गाण्यात गुलजार यांच्या शब्दांपेक्षा खय्याम यांचं संगीत मला खूप आवडतं. "उमराव जान"ची गाणी तर सगळ्यांना प्रचंड आवडतात, पण बाझारची गाणी त्याहून सुंदर मला वाटतात. "फिर छिडी रात बात फूलों की" असेल किंवा "दिखाई दिये यू" असेल प्रत्येक गाण्यात उर्दू शब्दांना असं काही चालीत गुंतलंय की आपण त्यांच्यासोबत गुंतून जातो. त्यानंतर आलेल्या "रजिया सुलतान" मधल्या "ए दिल-ए-नादाँ" गाण्यातला मोठा पॉज असो की "नुरी" या गाण्यातला मोठा आलाप असो प्रत्येक गाण्यात भारतीय संगीत वापरुन भारतीय वाद्य वापरुन ती गाणी अजरामर खय्याम साहेबांनी केली आहेत.
उगाच Versatile संगीतकार लोकांनी म्हणावं म्हणून, ते कसंही संगीत देत बसले नाहीत. तर याउलट जे चित्रपट घेतले, त्यांच्यामध्ये आपलं सर्वस्व, आपलं सर्व ज्ञान, सर्व कला ओतून त्यांनी काम केलं. पण जे काम त्यांनी केलं ते आपण विसरु शकत नाही. कभी-कभी, त्रिशूल तर कमर्शियल चित्रपट होते पण बाजारसारख्या चित्रपटात जिथे एका बाजूला सर्वच नवीन चेहरे होते, इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं अस्तित्व दर्शवू पाहणारे निर्माण करु पाहणारे असे चेहरे होते, त्या चित्रपटाला पण अद्भुत संगीत खय्याम साहेबांनी दिलंय. भारतीय चित्रपट सृष्टीतील समांतर सिनेमा चळवळीला संगीताने भरभक्कम आधार जर कोणी दिला असेल तर ते खय्याम साहेब असतील.
तसं बघायला गेलं तर 1947 पासून त्यांची कारकीर्द दिसते पण सत्तरीच्या दशकात ते प्रचंड फेमस झाले. 90 पर्यंत त्यांनी दर्जेदार संगीत दिलं. त्यानंतर अगदीच मोजक्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. या काळात त्यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पण मिळाले. तरी आजकालच्या पिढीला खय्याम म्हणजे कोण हे माहित नसतील किंवा डोक्यावर जोर देऊन आठवावे लागेल. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन अशी अनेक नावे आताच्या मुलांना माहिती आहेत पण खय्याम साहेबांना विसरुन देखील चालणार नाही.
काल ज्या वेळी त्यांची निधनाची बातमी आली तेव्हापासून मन सुन्न झालं. त्यांना भेटायची इच्छा खूप होती ती आता पूर्ण होऊ शकत नाही. बरं ते नुसतेच गेले नाहीयेत तर त्यांनी आपली सर्व संपत्ती ही नवोदित कलाकारांसाठी दान केलीय. इंडस्ट्रीत नाव टिकवून ठेवणं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालवणं किती अवघड आहे, याच त्यांच्या अनुभवातून त्यांनी सर्वच दान करुन टाकलं. हा ब्लॉग वाचून गुगलवर खय्याम हे नाव एकदा सर्च करुन बघाच, मी न लिहिलेली असंख्य तुमच्या आवडीची गाणी तुम्हाला खय्याम साहेबांच्या नावावर सापडतील. धन्यवाद!