जालना जिल्ह्यातील परतूर विधासभा मतदारसंघ विद्यमान आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यामुळे भाजप साठी प्रतिष्ठेचा बनला आहे. परंपरेप्रमाणे युतीत ही जागा भाजपकडे तर आघाडीत काँग्रेसकडे आहे. सध्याची राजकीय परिस्थित पाहता यावेळी विधानसभेत घमासान होणार हे निश्चीत आहे.

परतूर मतदारसंघाची रचना आणि इतिहास
परतूर मतदारसंघात पुनर्रचनेपूर्वी मंठा आणि परतूर या दोनच तालुक्यांचा समावेश होता. 2009 मध्ये झालेल्या पुनर्ररचनेनंतर या मतदारसंघात मंठा आणि परतूर तालुक्याव्यतिरिक्त जालना तालुक्यातील काही गावे समाविष्ट करण्यात आली. हा विधासभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या कक्षेत येतो.

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे बऱ्यापैकी आस्तित्व या मतदारसंघात होते. त्यामुळे 1967 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे हरिभाऊ खाडविकर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मात्र 1995 च्या निवडणुकी पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 1980 मध्ये इंदिरा काँग्रेसचे रामप्रसाद बोराडे हे शेतकरी कामगार पक्षाचे गंगाधर वायाळ यांचा पराभव करून निवडून आले. त्यानंतर रामप्रसाद बोराडे सर्वजनीक बांधकाम विभागाचे मंत्री बनले. 1985 मध्ये इंदिरा काँग्रेसने भगवानराव बोराडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्या वेळी समाजवादी काँग्रेसचे वैजनाथराव आकात निवडून आले. 1990 च्या निवडणुकीत वैजनाथराव आकात यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि भाजपच्या बबनराव लोणीकर यांचा पराभव करून ते निवडून आले.  त्यानंतर 1995 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी इंदिरा काँग्रेस पक्षाने वैजनाथराव आकात यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि या निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुल कदिर देशमुख हे त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे बबनराव लोणीकर यांचा पराभव करून निवडून आले. 1999 मध्ये झालेंल्या निवडणुकीत भाजपचे बबनराव लोणीकर हे पहिल्यांदाच इंदिरा काँग्रेसचे अब्दुल कदिर देशमुख यांचा पराभव करून निवडून आले. वैजनाथ राव आकात यांनी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लढवली होती परंतु त्यांचा यात पराभव झाला.

2004 मध्ये कांग्रेसच्या गोपाळ बोराडे आणि भाजपचे बबनराव लोणीकर यांच्यात प्रमुख लढत झाली. त्यामध्ये बबनराव लोणीकर निवडून आले. शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील नेते माधव कदम यांनी ही निवडणुक अपक्ष म्हणून लढवली होती, त्यांच्या उमेदवारीची चर्चा या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झाली. 2009 मध्ये या मतदार संघातून सुरेशकुमार जेथलिया अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. काँग्रेसचे अनवर देशमुख आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे बाबासाहेब आकात यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

परतूर मतदारसंघातील मतदार संख्या

पुरुष मतदार  : 1,53,797

महिला मतदार : 1,38,833

एकूण मतदार : 2,92,630
2014 ची निवडणूक जिल्ह्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत अटितटीची झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांचा 4 हजार 360 मतांनी पराभव करून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. भाजपकडून बबनराव लोणीकर हे सर्वाधिक मते घेऊन निवडून आले असले तरी त्यांच्या खालोखाल काँग्रेस उमेदवार सुरेश जेथलिया, त्या नंतर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात आणि अपक्ष उमेदवार निवास चव्हाण असा चौरंगी सामना पाहायला मिळाला होता. 2019 ला सुद्धा वंचितमुळे अशीच लढत पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

2014 मधील विधासभा उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते :

बबनराव लोणीकर (भाजप) : 46,937

सुरेश जेथलिया (काँग्रेस) : 42577

बाबासाहेब आकात (मनसे) : 37335

निवास चव्हाण (अपक्ष) : 24371

परंपरागत रित्या परतूर विधानसभा मतदार संघ युतीमध्ये भाजपकडे राहिलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही हा मतदारसंघ युती झाल्यास भाजपाकडेच राहील. विद्यामान मंत्री बबनराव लोणीकर यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळेल हे स्पष्ट आहे. माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्या विरोधात माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे पुत्र राजेश राठोड यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणास उमेदवारी देणार याकडे लक्ष लागलेले आहे.
सद्य स्थितीत भाजपकडून बबनराव लोणीकर आणि काँग्रेसकडून सुरेशकुमार जेथलिया उमेदवार म्हणून निश्चित आहेत. दरम्यान युती झाली नाही तर शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ए. जे बोराडे यांचे हे नाव पुढे केले जाऊ शकते. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडीकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास काँग्रेस उमेदवारास ही मोठी डोकेदुखी ठरू शकते, असेच वातावरण आहे.

या मतदारसंघाचा इतिहास पाहता 1972 नंतर मतदारांनी किमान 3 वेळेस प्रस्थापितांच्या वेळेस आमदार निवडून दिले आहेत. 1967 मध्ये त्या वेळचे काँग्रेसचे मतबदार पुढारी रामराव लोणीकर यांचा पराभव करून शेतकरी कामगार पक्षाचे हरिभाऊ खंडविकर निवडून आले होते. तर 1985 मध्ये त्या वेळचे काँग्रेसचे प्रतिष्ठीत पुढारी भगवानराव बोराडे यांचा समाजवादी काँग्रेसचे वैजनाथ राव आकात यांनी पराभव केला. तर 2009 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून सुरेश कुमार जेथलिया अपक्ष म्हणून निवडून आले होते.

पक्षीय ताकत आणि सामाजिक स्थिती :
या मतदारसंघातील परतूर नागरपरिषदेच अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे तर, मंठा नगर पंचायतीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. परतूर पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे तर जिल्हा परिषद पदी निवडून आलेल्या इंदिरा काँग्रेसच्या एका सदस्याकडे जिल्हा परिषदेत सभापती पद आहे.

भाजप ,काँग्रेस,शिवसेना यांचे राजकीय अस्तित्व असलेल्या परतूर विधासभा मतदारसंघात राष्ट्रवादी मात्र फारशी प्रभावशाली नाही. यावेळी निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्रित लढल्यास याचा फायदा युतीला होईल हे निश्चित मात्र संमिश्र जातीय समीकरणे असलेल्या या मतदारसंघात मराठा ,बंजारा, मुस्लिम, माळी समाजाचे मोठे मतदान आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी असणारा मतदार या मतदारसंघात बऱ्या पैकी आहे.
2019 लोकसभा निवडणूक-परतूर मतदारसंघातील बलाबल :

संजय जाधव (शिवसेना)---79 हजार 636

राजेश विटेकर (राष्ट्रवादी)--60 हजार 914

मतदारसंघातील प्रश्न :

आरोग्य, पाणी आणि बेरोजगारीचा प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहे, औद्योगिक विकास नसल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्या समस्या काही अंशी दूर झाल्या असल्या तरी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याच्या बाबतीत परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अनेक निवडणुकीत उमेदवारांकडून आश्वासन मिळत असले तरी हे रुग्णालय होऊ शकले नाही.

विकासाचे अनेक प्रश्न मतदार संघात कायम आहेत, त्यातील काही प्रश्न सोडवण्यात विद्यमान आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना यश आले असले तरी अद्याप आरोग्य, पाणी, सिंचन, आणि औद्योगिकरणाच्या बाबतीत मागासलेपणा कायम आहे. साहजिकच या निवडणुकीत झालेल्या आणि न झालेल्या कामांचे मुद्दे चर्चेत येणार आहेत.