औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सध्या देशात विरोधी पक्षनेता नाही, पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही विरोधी पक्षनेता उरणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल औरंगाबादमध्ये होती. यावेळी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. केंद्रात 2014 साली विरोधी पक्षनेता नव्हता, 2019 च्या निवडणुकीतही विरोधकांच्या एवढ्या जागा निवडून आल्या नाही, की त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल. लोकसभेत आता दहा वर्ष विरोधी पक्षनेता नाही. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता सोडा, त्यांचा विरोधी पक्षनेता देखील नसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुजोरीमुळे लोकांना त्यांना नाकारलं


सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राहायला कुणी तयार नाही. त्यांची मुजोरी लोकांनी अनुभवली आणि म्हणून त्यांना जनतेने नाकारलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. आम्ही पाच वर्षात जी कामं केली, जो विकास केला त्याच विकासाच्या माध्यमातून जनतेचा जनादेश घेत आहोत. पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्र समृद्ध करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.



मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करणार


मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करणार असून त्यासाठी गोदावरी खोऱ्यामध्ये अनेक माध्यमातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा सुजलाम-सुफलाम करु. आताची पिढी दुष्काळ पाहते तो अखेरचा असेल. मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.