हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे 1962 मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांनी मिळविला होता. हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक काळ सत्ता भोगली आहे. या मतदार संघात आजपर्यंत गोरेगावकरांच वर्चस्व राहिले आहे. 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे या मतदारसंघाचे आमदार होते.


2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊराव पाटील गोरेगावकर पराभूत झाले व त्यांच्या ठिकाणी भाजपच्या तानाजी सखारामजी मुटकुळे या नवीन चेहऱ्याला आमदार म्हणून संधी मिळाली.  2014 च्या राष्ट्रवादी, काँग्रेस,  शिवसेना आणि भाजप या चौरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तानाजी मुटकुळे प्रचंड मताधिक्याने निवडून आले.


2014 विधानसभा निवडणूक निकाल


तानाजी मुटकुळे (भाजप)  97,045 मतं 


भाऊराव पाटील (काँग्रेस)  40,599 मतं 


दिलीप चव्हाण (राष्ट्रवादी)  21,000 मतं 


दिनकर देशमुख (शिवसेना) 6,399 मतं


2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, विनायकराव  देशमुख, सुधीर आप्पा सराफ यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्या तिघांपैकी भाऊराव पाटील गोरेगावकर माजी आमदार यांची उमेदवारी निश्‍चित मानले जात आहे.


तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये प्राध्यापक संभाजी पाटील, अॅडवोकेट माधव बॅंडवाले यांच्यासह इतर 18 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.  तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून हिंगोली विधान मतदारसंघासाठी विधानपरिषदेचे आमदार रामरावजी वडकुते यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांचे नाव चर्चेत आहे. भाजप-शिवसेनेची विधानसभेसाठी युती होणार अशी चर्चा असली तरी शिवसेनेकडूनदेखील संदेश देशमुख, रामेश्वर शिंदे यांची नावे विधानसभेसाठी चर्चेत आहेत. कारण पूर्वी या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदाराचा शिवसेनेकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील हे हिंगोली मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत.


2019 लोकसभा निवडणूक निकाल


हेमंत पाटील (शिवसेना)  5, 86, 312 मतं 


सुभाष वानखेडे (काँग्रेस) 3, 08, 456 मतं 


मोनह राठोड (वंचित बहुजन आघाडी) - 1, 74, 051 मतं


वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार अजून निश्चित न केल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना धास्ती लागली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार  तानाजी मुटकुळे यांनी देखील 2014 च्या निवडणुकीमध्ये कयाधू नदीवर बॅरेजेस उभारण्याचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले नसल्यामुळे मतदार त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.



मतदार संघातील जातीय समीकरणे


हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे राजकारण हे सर्व जातीवर अवलंबून आहे. या मतदारसंघांमध्ये 1955 ते आजपर्यंत केवळ एक वेळा ओबीसी समाजाच्या आशाबाई टाले आमदार झाल्या होत्या. बाकी सर्व आमदार हे आजपर्यंत मराठा समाजाचे  झालेले आहेत. याचे प्रमुख कारण असे की, मराठा समाजामध्ये वऱ्हाडी पाटील व दखनिय पाटील (डावे आणि उजवे) असे दोन गट आहेत. या दोन्ही गटाने आजपर्यंत इतर जातीच्या लोकांना आमदार होऊ दिले नाही.


1955 ते 60 नारायणराव पाटील (मराठा)


1960 ते 70 बाबुराव पाटील  (मराठा) 


1970 ते 75 आशाबाई टाले (OBC)


1975 ते 78 दगडूजी गलांडे (मराठा)


1978 ते 80 : राष्ट्रपती राजवट लागू झाली होती 


1980 ते 85 साहेबराव देशमुख सेनगावकर (मराठा)


1985 ते 90 साहेबराव देशमुख गोरेगावकर (मराठा)


1990 ते 99 बळीराम ( बापू ) पाटील कोटकर  (मराठा)


1999ते 14 भाऊराव पाटील गोरेगावकर (मराठा)


2014 ते आज पर्यंत, तानाजी मुटकुळे (मराठा)


आज पर्यंत 8 आमदार या मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचेच झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे जातीवरच अवलंबून आहेत, असेच म्हणावे लागेल.