मुंबई : नवी मुंबईतील नेरुळच्या शिरवणे भागात रहाणारे भाजी व्यावसायिक अरविंद नानाभाऊ गुंड यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांच्याच मुलाने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी या हत्याप्रकारणात मृत अरविंद गुंड यांचा मुलगा अनिल गुंड याला अटक केली आहे. तसेच अरविंद गुंड यांची हत्या करणाऱ्या संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोन मारेकऱ्यांनाही पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.
या घटनेतील मृत अरविंद गुंड यांचा एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यावसाय असून ते शिरवणेमध्ये कुटुंबासह राहत होते. मागील गुरुवारी अरविद यांची पत्नी कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यामुळे घरामध्ये अरविंद गुंड आणि त्यांचा मुलगा अनिल हे दोघेच होते. त्यामुळे अनिल गुंड याने संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांना गुरुवारी सकाळी वडिलांची हत्या करण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलावून घेतले होते. काही वेळाने कामानिमित्त बाहेर जाण्याचा बहाणा करुन तो घरातून निघून गेला. त्यानंतर संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांनी अरविंद गुंड यांची हत्या करुन तेथून पळ काढला. त्यानंतर दुपारी 12.30 च्या सुमारास अनिलने घरी पोहोचून वडिलांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या झाल्याचा कांगावा केला होता.
नेरुळ पोलिसांनी केलेल्या तपासात अरविंद गुंड यांचा मुलगा अनिल गुंड यानेच दोघा मारेकऱ्यांना घरामध्ये घेतल्यानंतर तो घरातून बाहेर गेल्याचे आढळून आले. तसेच ज्या वेळेत अरविंद गुंड यांची हत्या झाली, त्या कालावधित अनिल गुंड हा त्याच भागात वावरत असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी अनिल गुंड याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी सुरु केली. यावेळी अनिलने त्याचे साथीदार संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांना 3 लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
अनिल गुंड याने डिप्लोमा केल्यानंतरदेखील तो काहीच कामधंदा करत नव्हता. अनिल दारु आणि गांजाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे वडील त्याला पैसेदेखील देत नव्हते. यामुळेच त्याने वडिलांची हत्या घडवून आणली.
पैशांसाठी मुलानेच बापाची सुपारी देऊन केली हत्या
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
02 Aug 2019 08:27 PM (IST)
नवी मुंबईतील नेरुळच्या शिरवणे भागात रहाणारे भाजी व्यावसायिक अरविंद नानाभाऊ गुंड यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांच्याच मुलाने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -