औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर शासकीय रुग्णालयातले डॉक्टर नुकतंच बाळंत झालेल्या विवाहितेसाठी यमदूत ठरले आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांना केला आहे. प्रसूतीच्यावेळी सिजेरियन सर्जरी करताना पोटात कापसाचा बोळा राहिल्यानं तनुश्री तुपे या महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय उपरुग्णालयात 22 जुलै रोजी तनुश्री तुपे नावाची महिला प्रसुतीसाठी दाखल झाली. 23 जुलैला तनुश्रीचे सिजरिंग करण्यात आलं. त्यावेळी तनुश्रीने एक गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र याच वेळी डॉक्टरांकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला आणि हा कापसाचा बोळा तनुश्रीच्या पोटात डॉक्टर विसरून गेले. मात्र लगेचच तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि 28 जुलै रोजी तिचं निधन झालं. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचं उघड झाल्यानं नातेवाईकांनी गंगापूर शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दहा दिवसाचं बाळ आईच्या मायला पोरकं झालं आहे. सिजरिंग नंतर दोन दिवस तनुश्रीने आपल्या बाळाला दूध पाजलं मात्र त्यानंतर तिला असह्य वेदना सुरू झाल्या, उलट्या, मळमळ व्हायला लागल्याने पुन्हा तनुश्रीच्या आई-वडिलांनी तिला गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. ज्या रवींद्र ठेवाल नावाच्या डॉक्टरांनी तनुश्रीचं सिजरिंग केलं होतं त्यांनी पुन्हा तनुश्रीची तपासणी केली आणि पुढच्या उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवलं. त्याच वेळी 28 जुलैला तनुश्रीची प्राणज्योत मालवली.
तनुश्रीच्या नातेवाईकांनी आज गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. जिल्हा आरोग्य विभागानं डॉक्टर रवींद्र ठवाळ यांना निलंबित केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरांना केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्यांचा मेडिकल प्रॅक्टिसचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तनुश्रीच्या वडिलांनी केली आहे.