लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून 'एआयएमआयएम'-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. जलील यांना अनपेक्षित मतं मिळाली ती गंगापूर मतदारसंघातून. एरवी गंगापूर-वैजापूर हा चंद्रकांत खैरे यांच्या हक्काचा लीड देणारा मतदार संघ. मात्र हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात मराठा कार्ड खेळले. खुलताबाद येथील बहुसंख्य मुस्लीम समाज आणि तालुक्यातील दलित समाजाने एकवटून इम्तियाज जलील यांना मतदान केलं. त्यामुळे वीस वर्षात शिवसेनेला पहिल्यांदाच या मतदारसंघात फटका बसला. शिवसेना-भाजप या विधानसभा निवडणुकीला एकत्र लढेल असं सध्या तरी वाटतंय. राज्याच्या 21 मतदार संघातून शिवसेना भाजप मध्ये तू-तुम्ही होण्याची शक्यता आहे. त्यातीलच हा गंगापूर मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघात आमदार प्रशांत बंब 2009 ला अपक्ष म्हणून आणि 2014 ला भाजपाच्या चिन्हावर येथून निवडून आले आहेत. त्यामुळे सहाजिकच हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल. या मतदारसंघात गंगापूर, खुलताबाद या दोन तालुक्यांचा समावेश आहे. जलील यांच्या विजयामुळे आता गंगापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मतमोजणी आधीच केली होती. गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी युती धर्माचे पालन केल्याचाही खैरे यांनी ठणकावून सांगितलं होतं. बंब यांनी प्रामाणिकपणे आपले काम खैरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. बंब यांनी खैरेच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या. पण, या विधानसभा मतदारसंघातून दानवे यांचे जावई अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खैरे राहिले. खुलताबाद नगर पालिकेत काँग्रेसची सत्ता असूनही काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना नगरसेवकांची साथ मिळली नाही. काँग्रेसच्या आजी-माजी नगराध्यक्षसह नगरसेवकांनी उघडपणे 'एआयएमआयएम' उमेदरवार इम्तियाज जलील यांचा प्रचार केला. मुस्लिम मतदारांनी जलील यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. परिणामी, तिसऱ्या क्रमांकाची मते जलील यांनी घेतली आहेत. खैरे यांना 60082, जाधव 64393, जलील यांना 56023मते मिळाली आहे. ही आकडेवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धोक्याची घंटा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप वेगवेगळे लढले होते. त्यावेळचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व पुन्हा विधानसभेत गेले. या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली, विधानसभा निवडणुकीतही युतीच राहणार, असे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गंगापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा सांगण्याची दाट शक्यता आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन यांना घेण्यासाठी आतापासूनच खल सुरू झाला आहे.
मतदारसंघ कोणाला? सेना-भाजपाच्या रस्सीखेच होणार
लोकसभा निवडणुकीत 'मराठा' कार्ड खेळलेले हर्षवर्धन जाधव यांना सर्वाधिक मते मिळाली. या मतदारसंघात 'मराठा स्पिरिट' असल्याचा अंदाज आल्यामुळेच शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, युवासेनेचे संतोष माने, खुलताबादचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी मतदारसंघ पिंजून काढला. हे सर्व जण विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार आहेत.
गंगापूर मतदार संघातील जातीय समीकरणांवर नजर टाकल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं. त्याबरोबरच माळी, धनगर, दलित-मुस्लिम यासह इतर समाजही या मतदारसंघांमध्ये आहे .असं असलं तरी गेल्या दहा वर्षांपासून येथे प्रशांत बंब हे आमदार आहेत. त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामं केली आहेत.
विद्यमान आमदार असल्यामुळे भाजप हा मतदारसंघ सहजपणे सोडणार नाही. शिवाय बंब यांची मतदारसंघावर असलेली पकड हे सुद्धा प्रबळ कारण ठरू शकते. युतीमध्ये मतदारसंघ भाजपकडे गेल्यास शिवसेनेचे इच्छुक बंडखोरी करणार की, पक्षादेश पाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना पन्नास हजारापेक्षा अधिक मतदान मिळाले, त्यामुळे वंचित ने औरंगाबाद मध्ये या मतदारसंघातून मुलाखती घेतल्या त्यावेळी 22 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मतदारसंघांमध्ये खुलताबाद, दौलताबाद या भागात मुस्लिम समाजाची संख्या अधिक आहे त्यामुळे हा मतदार संघ आपल्याला मिळावा म्हणून एमआयएम देखील प्रयत्नशील राहील. एमआयएमकडून इच्छुक असलेले काही नेते या मतदारसंघ पायदळी तुडवत असल्याचं पहायला मिळतेय.
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडी मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो राष्ट्रवादीचे अनेक नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यामध्ये आघाडीचं नाव आहे ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आणि डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ यांचं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून कोणाला किती मतदान?
हर्षवर्धन जाधव 64339
चंद्रकांत खैरे 60082
इम्तियाज जलील 56025
सुभाष झांबड 12781
2014च्या विधानसभा निवडणुकीत कसे झाले होते मतदान?
प्रशांत बंब (भाजप) : 55143 मते
अंबादास दानवे (शिवसेना) : 38 हजार 205 मते
कृष्णा डोणगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस) : 33 हजार 216 मते
शोभाताई कोरे (काँग्रेस) : 16126 मते
2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणारे कृष्णा पाटील डोणगावकर हे सध्या शिवसेनेत आहेत. संतोष माने यांनी देखील घोषणा केली आहे की शिवसेनेला हे तिकीट मिळालं नाही तर आपण बंडखोरी करून अपक्ष उभा राहू. त्यामुळे शिवसेना-भाजपाला 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीची बंडखोरीचं ग्रहण लागेल हे नक्की आहे. प्रशांत बंब यांचा देखील या मतदारसंघावर चांगली पकड आहे. लोकसभेला एमआयएम वंचित बहुजन आघाडीला पन्नास हजारापेक्षा अधिक मते मिळाल्याने त्यांना देखील येथे हे विजयाची आशा आहे. कांग्रेस राष्ट्रवादी देखील आपली शक्ती पूर्णपणे या मतदारसंघांमध्ये लावल्याशिवाय राहणार नाही. या मतदार संघातल्या लढती चौरंगी पंचरंगी होणार यात काही शंका नाही. पाहुयात या मतदारसंघाचा भावी आमदार कोण होतो.
गंगापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रशांत बंब हॅट्रिक करणार?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
31 Jul 2019 05:18 PM (IST)
गंगापूर मतदार संघातील जातीय समीकरणांवर नजर टाकल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं. त्याबरोबरच माळी, धनगर, दलित-मुस्लिम यासह इतर समाजही या मतदारसंघांमध्ये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -