मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात येत्या 6 ऑगस्टपासून या 'शिवस्वराज्य' यात्रेला सुरुवात होणार आहे.


राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेची धुरा सोपवण्यात आली असून खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.


शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होणार आहे. रोज 3 विधानसभा मतदारसंघातून ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा येथे संपणार आहे.


तुळजापूर येथून 16 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे.


गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीतून अनेक नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशा बिकट परिस्थितीत कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्यासाठी आणि निवडणुकीच्या काळात नवा उत्साह भरण्यासाठी या यात्रेची मदत होऊ शकते.


मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. महाजनादेश यात्रेची सुरुवात तिवसा तालुक्यातील मोझरी पासून 1 ऑगस्टला होणार आहे. पहिला टप्पा मोझरी ते नंदुरबार असा असणार आहे, तर दुसरा टप्पा अकोले ते नाशिक असा असणार आहे. नाशिकच्या तिर्थक्षेत्रात यात्रेचा समारोप होईल. मुंबई वगळता 30 जिल्हे, 152 विधानसभा क्षेत्र, साडेचार हजार किमीचा प्रवास, सुमारे 300 सभा या यात्रेदरम्यान होणार आहेत. 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा होतील.