औरंगाबाद शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेना निर्विवाद बाजी मारत आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट गेल्या दशकापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत.


औरंगाबाद पश्चिम मतदार संघ शहरात असला तरी शहराबाजूची अनेक गावं या मतदारसंघामध्ये आहेत. औरंगाबाद शहराच्या बाजुला वाढलेला सातारा परिसर, पंढरपूर, माळीवाडा पासून ते कांचनवाडीपर्यंत अशी अनेक गावं या मतदारसंघात येतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप या मतदारसंघातून वेगळे लढले होते. या दोघांमध्येच खरी लढत पाहायला मिळाली. त्यात शिवसेनेने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत होते. एमआयएमने देखील माजी मंत्री गंगाधर गाडे यांना या मतदारसंघातून उभं केलं होतं. मात्र औरंगाबाद शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघांपैकी एमआयएममला सर्वात कमी मते या मतदारसंघात मिळाली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून पहिल्यांदा लीड मिळाली होती. जातीय समीकरणांमध्ये संमिश्र असा हा मतदार संघ आहे. त्यामुळेच शिवसेनेला शहरातील तीन मतदार संघातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून अनेक जण या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने या मतदार संघातून अधिक मत मिळावेत म्हणून प्रकाश आंबेडकर आणि ओवैसींची सभा याच मतदारसंघातील मैदानावर  घेतली होती. तरी देखील शिवसेनेला अधिक मते मिळाली आहेत. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीची शेवटची प्रचारसभा ज्यावेळी झाली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभेतच वंचितकडून या मतदारसंघातून अमित भुईगळ लढतील अशी घोषणाही करून टाकली होती. मात्र अमित भुईगळ स्वतः औरंगाबाद मध्य मधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अमित भुईगळ यांनी 2009 साली या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावले होते. त्यावेळेस त्यांना चार हजार देखील मते मिळाली नव्हती.



एमएमआयएमचे अनेक नेते देखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत यात सर्वात आघाडीवरचं नाव म्हणजे अरुण बोर्डे. काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे इच्छुक आहेत .गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघांमध्ये कामही सुरू केलंय.  या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचा तसा प्रभाव दिसत नाही. कधीकाळी या मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांनी बाजी मारल्याचा इतिहास मात्र हा मतदारसंघ जसा राखीव झाला तशी या मतदारसंघावरची काँग्रेसची पकड ढिली झाली आहे.



लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराल किती मते ?

चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 77274 मते 
इम्तियाज  जलील (एमआयएम) : 71239 मते
हर्षवर्धन जाधव (अपक्ष) : 38087 मते
सुभाष झांबड (कांग्रेस) : 15595 मते 

लोकसभेला शिवसेना-भाजपा एकत्र लढले होते. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप एकत्र लढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इथे शिवसेनेचे पारडे जड राहील. पण शिवसेना भाजप जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर मात्र इथे शिवसेना-भाजपा विरुद्ध एमआयएम अशी तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. अर्थात असं होण्याची शक्यता तूर्तास तरी कमी आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मते?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांना 61 हजार 282 मते मिळाली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपाच्या मधुकर सावंत यांना 54355 मतं मिळाली ते दुसऱ्या स्थानावर होते. तर एमआयएमचे तत्कालीन उमेदवार गंगाधर गाडे यांना 35 हजार 348 मतं मिळाली होती.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांना मिळणारी दलित समाजाची मतं आपल्याकडे वळतील असा विश्वास एमआयएमला आहे. मात्र 2014 चा विधानसभेचा निकाल पाहता आणि 2019 च्या लोकसभेच्या निकाल पाहता शिवसेनेचे पारडे इथे जड असलेले पाहायला मिळते. या मतदार संघात 2019 ची विधानसभा निवडणूक सेना-भाजपा विरुद्ध एमआयएम, वंचित आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे. शेवटी काँग्रेसला किती मते मिळतात आणि शिवसेनेला मिळणारी दलित समाजाची मते आपल्याकडे खेचण्यात वंचित-एमआयएमला किती यश मिळतं यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल. या मतदार संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.