मुंबई : पुण्यातील वेल्हा तालुक्याचे राजगड असं नामकरण झालं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वेल्हा तालुक्यातील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा वेल्हा तालुक्याचा लौकीक आहे. किल्ले राजगड देखील वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार स्वराज्याचा कारभार पाहिला होता. स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले व ते प्रत्यक्षात आणले, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.







मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे, त्या किल्ल्याचे नाव या तालुक्याला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.


जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते 1947 पर्यंत 'राजगड तालुका' असाच वेल्हा तालुक्याच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असाच उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.