मुंबई : मुंबई शहर ड्रीम सिटी म्हणून ओळखली जाते. देशातून, परदेशांना अनेक जण आपली स्पप्न पूर्ण करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मुंबई जेवढ्या वेगाने आकाराने वाढली तेवढ्यात वेगाने मुंबईतील गुन्हेगारीही वाढली. याच गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. 'एम्बिस' या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगाराची योग्य माहिती पोलिसांना काही सेकंदात मिळणार आहे. यामुळे गुन्हेगारी कमी होईल याची खात्री मुंबई पोलिसांना आहे.


गेल्या काही वर्षात मुंबईत गुन्ह्यांचा आलेख हा चढता राहिला आहे. शहरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांवर आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा नेहमीच वापर केला. गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून सुटू नये, यासाठी मुंबईतील सर्व 94 पोलीस स्टेशनमध्ये ऑटोमेटेड मल्टी-मॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफीकेशन (AMBIS) एम्बिस हे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत गुन्हेगारीला चाप बसावा यासाठी हे मुंबई पोलिसांच महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे.


एम्बिस सॉफ्टवेअरचा वापर करणारे मुंबई पोलीस हे देशातील पाहिलं पोलीस दल आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुगल प्रमाणे हे सॉफ्टवेअर काम करणार आहे. मुंबईच्या सर्व 94 पोलीस स्टेशनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच लवकरच राज्यभरातील पोलीस देखील तंत्रज्ञान वापरणार आहेत. जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही.


एम्बिस सॉफ्टवेअरमध्ये गुन्हेगाराचा फोटो, बोटांचे ठसे, डोळ्यांचा स्कॅन केलेला डेटा यांचा रेकॉर्ड असणार आहे. त्यामुळे काही सेकंदात गुन्हेगाराचा शोध घेणे शक्य होणार आहे. डेटा अपलोड असल्यास गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्यास, सॉफ्टवेअरमध्ये माहिती टाकल्यानंतर काही सेकंदात त्या गुन्हेगाराची माहिती समोर येणार आहे.


एम्बिस या तंत्रज्ञानामुळे सर्व गुन्हेगारांचा डेटा रेकॉर्ड केला जाणार आहे. मुंबई पोलिसांकडे 1947 पासून जो काही गुन्हेगारांचा डेटा आहे, तो देखील अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा डेटा इंटरपोलसोबत शेयर केला जाणार आहे.