या पाच वर्षांत अकोटच्या राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. जिल्ह्यात सर्वात मोठी 'अँटी इन्कम्बन्सी' हा मतदारसंघात असल्याचं जनमाणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. मागच्या वर्षांत आमदार भारसाकळेंनी निष्क्रीय राहात योग्य जनसंपर्क न ठेवल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत. त्यातच भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा 'रेड झोन'मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपल्या या पारंपारिक मतदारसंघावर ताकदीनं दावा सांगितला आहे. त्यामुळे अकोटवरून पुढच्या काळात भाजप-शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये अकोटच्या तिकीटासाठी मोठी स्पर्धा पहायला मिळते आहे. प्रत्येकजण आपल्या उमेदवारीनं विजयाचं गणित कसं सोपं होणार याचं रसभरीत विश्लेषण पक्ष, नेते अन जनतेसमोर करताना दिसतो आहे.
अकोटच्या क्षितिजावर 1990 पर्यंत काँग्रेसचा सूर्य कधी मावळत नव्हता, असे बोलले जायचे. पण 1990 च्या दशकात या मतदारसंघाचे चित्र बदलले. कारण, जिल्ह्याच्या राजकीय सारीपटावर भारिप-बहुजन महासंघ आणि शिवसेनेचा उदय झाला होता. अन अकोटमधील पक्षांतर्गत भांडणात गुंतल्याने काँग्रेस अस्त होत गेलाय. याचा आपसूकच फायदा होत गेलाय तो शिवसेनेला. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलूनही येथील मतदारांनी शिवसेनेचा भगवाच हातात घेतला होता. 1990 ते 2014 दरम्यान झालेल्या सहा निवडणुकांपैकी चारवेळा येथून शिवसेना विजयी झाली. तर प्रत्येकी एक वेळा भारिप-बहुजन महासंघ आणि भाजप येथून विजयी झाले आहेत. या सर्व निवडणुंकांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक निवडणुकीत नवा उमेदवार निवडून आला. या पाच वर्षांत अकोट मतदारसंघाच्या राजकारणाचा 'ढंग' तोच असला तरी 'बाज' काहीसा बदलला आहे. आता दबक्या आवाजात जन्म अन कर्मानं अकोटच्या मातीतल्या भूमिपुत्राला 'संधी' देण्याचा सुर येथील मतदारांतून ऐकायला मिळतो आहे. त्यामुळेच येणारी विधानसभा निवडणूक येथील सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी अन अस्तित्वाची सत्वपरीक्षा घेणारी असणार आहे.
विद्यमान आमदार बारसाकळे
2014 मधील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
1. प्रकाश भारसाकळे : भाजप :70,086.
2. महेश गणगणे : काँग्रेस : 38,675.
3. प्रदीप वानखडे : भारिप-बमसं : 32,350.
4. संजय गावंडे : शिवसेना : 14,024.
5. राजू बोचे : राष्ट्रवादी : 3,200.
विजयी : प्रकाश भारसाकळे : भाजप : 31,411
अकोट विधानसभा मतदारसंघ. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ. या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात तब्बल 2 लाख 80 हजार 255 मतदार आहेत. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सृष्टीची उधळण, मेळघाटचा समाविष्ट असलेला अर्धा भाग, नरनाळा किल्ला आणि या भागातील आदिवासी संस्कृती, या बाबी या मतदारसंघाचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व सांगणाऱ्या आहेत. यासोबतच हा मतदारसंघ नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि नवीन विचार आणि राजकीय प्रयोगांना चालना देणारा ठरला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाने 1985 नंतर प्रत्येक निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी दिली. तसे पहिले तर महाराष्ट्र निर्मितीनंतर प्रत्येक निवडणुकीत येथून काँग्रेसला ताकद आणि विजय मिळाला आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात 1990 च्या राजकारणात शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघाचा उदय झाला अन येथील काँग्रेसची परंपरागत 'वोट बँक' असलेला मराठा आणि दलित समाज या दोन पक्षांमध्ये विखुरल्या गेलाय, तो अगदी आतापर्यंत.
अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या (लोकसभा निवडणूक आकडेवारीनुसार)
1. एकूण मतदार : 2,80,255
2. पुरूष मतदार : 1,48,135
3. स्त्री मतदार : 1,32,120
या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहे. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेत. लोकसभेत येथून भाजपला 52, 211 हजार मतांची आघाडी आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे स्थानिक असूनही या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
1. संजय धोत्रे : भाजप : 96,706
2. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी : 39,177
3. हिदायत पटेल : काँग्रेस : 44,495
मताधिक्य : संजय धोत्रे : भाजप : 52,211
निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाल्याने भाजपमध्ये तिकीटासाठी प्रत्येक इच्छुकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. या मतदारसंघावर भाजपचे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि स्थानिक खासदार संजय धोत्रे यांचं मोठं वर्चस्व आहे. सोबतच दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते, माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना मानणारा मोठा वर्गही या मतदारसंघात आहे. अकोट आणि तेल्हारा या दोन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र, स्थानिक आमदारांच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. भाजपाच्या प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हाराच्या नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे आणि ज्येष्ठ नेत्या स्मिता राजणकर यांचा समावेश आहे. सोबतच ऐनवेळी एखादं नवं नावही भाजपच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ शकतं.
शिवसेनेनं हा आपला नैसर्गिक मतदारसंघ असल्याचे सांगत अकोटवर ताकदीनं दावा सांगितला आहे. 1990, 1995, 2004 आणि 2009 असा तब्बल चारदा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र, 2014 मध्ये युती तुटली अन हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. मतदारसंघात भारसाकळेंविरोधात वातावरण असल्याचं कारणही शिवसेना मतदारसंघावर दावा करताना देत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे दिग्गज नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. पक्षानं या मतदारसंघाची जबाबदारी दिलेले विधानपरिषदेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया हे येथून लढायला उत्सुक आहेत. सोबतच पक्षाचे 2009 मध्ये विजयी झालेले माजी आमदार संजय गावंडे यांनीही अलीकडे पक्षातील सक्रियता वाढविली आहे. सोबतच अकोल्यातील प्रथितयश डॉक्टर आणि शिवसेना नेते डॉ. विनित हिंगणकर हे मतदारसंघात पाच वर्षांपासून सक्रीय आहेत. विशेष म्हणजे डॉ. हिंगणकर अकोटमधील सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या हिंगणकर परिवारातले आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीला सहकार गटाचं सहकार्यही मिळू शकतं. याशिवाय इतर दावेदारांमध्ये उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडीच्या प्रा. माया म्हैसने आणि नगरसेवक मनिष कराळे यांचा समावेश आहे.
यासोबतच अनेक गटात विखुरलेल्या काँग्रेसमध्ये अनेकांनी उमेदवारीसाठी शड्डू ठोकले आहेत. हा मतदारसंघ राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते अन् विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे यांचा पारंपारिक असलेला मतदारसंघ. मात्र, 1990 पासून प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात सातत्याने गणगणे कुटुंबियांचा पराभव झाला आहे. मागच्या निवडणुकीत सुधाकर गणगणेंनी मुलगा महेशला रिंगणात उतरवलं होतं. मात्र, महेश गणगणे यांना त्या निवडणुकीत तब्बल 32 हजार मतांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे यावेळी गणगणे कुटुंबियांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून प्रचंड विरोध आहे. काँग्रेसकडून मागच्यावेळचे पराभूत उमेदवार महेश गणगणे माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचा मुलगा आणि माजी नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे हे प्रमुख दावेदार आहेत. यासोबतच ज्येष्ठ सहकार नेते रमेशमामा म्हैसने, ज्येष्ठ महिला नेत्या डॉ. संजीवनी बिहाडे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोंद्रे आणि कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा यांचा समावेश आहे.
या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे. मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद मतदारसंघासह अकोट आणि तेल्हारा पंचायत समित्या आंबेडकरांच्या ताब्यात आहेत. शिवाय त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष याच मतदारसंघातून दिल्यानं त्यांनी येथील निवडणुकीची गणित आधीपासूनच मांडायला सुरूवात केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून अनेकांनी उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, वंचितमध्ये 'लॉबिंग'ला कोणतंच महत्व नाही. कारण, या पक्षात चालतो तो प्रकाश आंबेडकरांचा आदेश आणि 'व्हेटो पॉवर'. वंचितकडून मागचे पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे या प्रमुख दावेदार आहेत. यासोबतच जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांचाही वंचितच्या उमेदवारीवर दावा आहे.
या मतदारसंघात प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबरच तीन उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीचीही मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे. यामध्ये प्रामुख्याने चर्चा आहे ती शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे यांच्या उमेदवारीची. मागच्या पाच वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका घेत आपला लोकसंपर्क कायम ठेवला. यासोबतच दुसरं चर्चेतलं नाव म्हणजे 'लोकजागर मंचा'चे अनिल गावंडे यांच्या उमेदवारीची. त्यांनी 'लोकजागर मंच'च्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम मतदारसंघात घेतले. गावंडेंनी शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न चालवले आहेत. मात्र, गावंडेच्या नावाला खासदार संजय धोत्रेंचा प्रचंड विरोध असल्यानं त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील?, हा प्रश्न आहे. तिसरं चर्चेतलं नाव आहे बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचं. पुंडकर यांनी मतदार संघातील प्रत्येक समस्या आक्रमकपणे मांडत मतदारसंघासह जिल्ह्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्यामूळे या तिघांच्या उमेदवारीचा या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर कसा परिणाम होतो?, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
प्रमुख पक्षांचे संभाव्य उमेदवार
1. भाजप : विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे, अकोट नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, पुरूषोत्तम चौखंडे, स्मिता राजणकर.
2. शिवसेना : विधानपरिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार संजय गावंडे, डॉ. विनित हिंगणकर, मनिष कराळे, प्रा. माया म्हैसने.
3. काँग्रेस : महेश गणगणे, सहकारनेते रमेशमामा म्हैसने, माजी नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे, मोहम्मद बद्रूजम्मा.
4. वंचित बहुजन आघाडी : जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे.
5. इतर : ललित बहाळे (शेतकरी संघटना), तुषार पुंडकर (बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष), अनिल गावंडे (लोकजागर मंच).
हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर असलेला आहे. या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असताना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. सध्या या मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्ते आणि सिंचन. येथील एमआयडीसीत जेमतेम 30-35 उद्योग सुरु आहेत. कोणतेच मोठे उद्योग नसल्याने येथील बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहेय. याशिवाय येथील शेती ही खार-पाण पट्ट्यात येणारी असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. वाण आणि पोपटखेड सिंचन प्रकल्पातून होणार सिंचन पूर्ण क्षमतेनं होत नसल्यानं शेतकरी कायम चिंतेत असतात. त्यासोबतच कृषीवर आधारित उद्योगांची मोठी वाणवा येथे दिसून येते. या भागात बॅरेजेसची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने या भागातील कृषी विकास अद्यापही थंड बस्त्यात पडलाय. शिवाय सहकार क्षेत्रातील भ्रष्ट प्रवृत्तीमुळे येथील एकमेव असलेली सहकारी सूतगिरणी बंद पडली आहेय. संपूर्ण मतदारसंघात रस्त्यांचा मोठा प्रश्न आहेय . मतदार संघातील मोठा भाग सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने कुपोषण आणि क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीच्या आजाराचा मोठा प्रश्न आहे.
मतदारसंघातील प्रमुख समस्या
1) रस्त्यांची झालेली प्रचंड दुरावस्था.
2) कृषीवर आधारित उद्योगांची वाणवा.
3) आदिवासी भागातील कुपोषण आणि क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न.
4) बेरोजगारी आणि उद्योगघंद्याचा प्रश्न.
शेवटी एकच. निवडणूक येतेय अन जाते. प्रत्येक निवडणुकीत विकासाची स्वप्नं येथील जनतेला दाखवली जातात. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा 'पुढचे पाठ, मागचे' सपाट' अशी परिस्थिती या मतदारसंघात दुर्दैवाने प्रत्येकवेळी पहायला मिळते. या निवडणुकीत हा दुर्दैवी फेरा थांबेल का? सोबतच येथील लोकप्रतिनिधींच्या विकास संवेदना जागृत होतील का?, या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधणारी कदाचित ही निवडणूक असू शकेल...
हे ही वाचा