अहमदनगर : नेवासा हि संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली.  तसेच अमृतमंथन च्या वेळी भगवान विष्णूंनी  मोहिनीराज अवतार घेतला ते प्राचीन मंदिर हि याच नेवासा गावात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पूर्वीचा नगर नेवासा आणि शेवगाव नेवासा असणारा मतदार संघ 2009 साली स्वतंत्र नेवासा मतदार संघ निर्माण झाला. 2009 पासून गडाख कुटूंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात 2014 साली भाजप न यश मिळवीत परिवर्तन केलं. राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांचा पराभव करीत भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे विजयी झाले.

यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडे भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे. गोदावरी, प्रवरा आणि मुळा या तिन नद्यांचा संगमही याच तालुक्यात होतो, ज्याला प्रवरासंगम म्हणुन ओळखल जात. संत ज्ञानेश्वर मंदिर , मोहिनीराज मंदिर , देवगड देवस्थान तसेच शनिदेवाच स्वयंभू स्थान असलेल शनिशिंगणापुर अशी महत्वाची धार्मिक स्थळे या मतदार संघातच आहे.

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच वर्चस्व असलेला मतदारसंघ. मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटी यांची मुहूर्तमेढ यशवंतराव गडाख यांनी रोवली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किंवा स्थानिक संस्था यावर गडाखांच प्राबल्य दिसुन येतं. शनि शिंगणापुर देवस्थानवरही विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणुन गडाखांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागली हे विशेष.

नेवासा तालुका कायम विद्रोही विचाराचा आणि परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो. पूर्वीं शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही. तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करुन वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं. त्यानंतर लंघे यांचा पराभव करुन 10 वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले यांचा पराभव करुन अपक्ष तुकाराम गडाख, 1995 साली तुकाराम गडाखांचा पराभव करुन पांडुरंग अभंग हे आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2004 राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले. 2009 साली नेवासा मतदार संघ स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आणि यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख मतदारसंघाचे प्रतिनीधी झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधुन भाजपात गेलेले बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाखांवर चार हजार 652 मतांनी निसटता विजय प्राप्त केला.

2014  साली उमेदवारांना मिळालेली मते

शंकरराव गडाख (राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी) - 79911

बाळासाहेब मुरकुटे (भाजपा)                    - 84570

काय होईल या निवडणुकीत?

राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने शंकराव गडाख यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीनंतर सोडचिठ्ठी दिली. शेतकरी क्रांतीकारी पक्षाची स्थापना करत शंकरराव गडाख यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षात अनेक आंदोलन करीत शंकरराव गडाख यांनी शासकीय दरबारी निवेदन दिली. या निवडणुकीत कोणातही पक्ष स्वीकरण्यापेक्षा शंकरराव गडाख शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या झेंड्याखाली अपक्षच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. तर नेवासा तालुक्याचे भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना देखील भाजपच्या एका गटाकडून विरोध होताना दिसतोय. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरु आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही विजयाची समीकरणे बिघडू शकतात. लोकसभा निवडणुकीत वंचितचे संजय सुखदान यांनी चांगली मते मिळवली होती. संजय सुखदान नेवासा येथील असल्याने त्यांचही नाव चर्चेत आहे.  शंकरराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे यांसह वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास नेवासा मतदार संघात चौरंगी लढत पाहावयास मिळेल हे मात्र नक्की.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न

  • देहु आळंदी तिर्थक्षेत्र विकासाच रखडलेल काम.

  • पिण्याच्या पाणी योजनेच रखडलेल काम.

  • धार्मिक पर्यटन विकासाला चालना.