मुंबई : मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. कृपाशंकर सिंह उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.


दिल्लीत आज मुंबईतील विधानसभा जागांविषयी स्क्रिनिंग कमिटीची बैठक होती. या बैठकीत सर्व माजी मुंबई अध्यक्षांना त्यांची मते जाणून घेण्यासाठी बोलवले होते. या बैठकीत काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि कृपाशंकर सिंह यांच्यात तिकीट वाटपावरुन वाद झाला. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी कृपाशंकर सिंह यांना पाच मिनिटात मुंबईचा फीडबॅक देण्यास सांगितले. मात्र पाच मिनिटात मुंबईतील सर्व जागांविषयी कसं सांगू शकणार? असं कृपाशंकर यांनी म्हटलं. तसेच मुंबई काँग्रेसच्या कामकाजाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


कृपाशंकर सिंह यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या लेखी आपले मत पाठवा आणि तुम्हाला येण्याची गरज नाही, असं सांगितलं. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांचं वागणं कृपाशंकर सिंह यांना खटकलं आणि त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. कृपाशंकर सिंह भापपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होतीच, त्यात त्यांना आज कारणही मिळालं.


काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपाशंकर सिंह आपला मुलगा नरेंद्र याला विधानसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे. काँग्रेसची अवस्था सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीत उतरवण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांनीच निवडणूक लढवावी, अशी मल्लिकार्जुन खरगे यांची इच्छा आहे. मात्र आपल्या कलिना विधानसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवायचं आहे.


मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा


कृपाशंकर सिंह मुंबईमधील उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली होती.


संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कृपाशंकर सिंग अस्वस्थ होते. निरुपम यांना हटवण्यात यावे आणि मिलिंद देवरा यांना नेतृत्व द्यावे, ही मागणी दिल्लीत करण्यात कृपाशंकर सिंग देखील एक नेते होते.


काँग्रेसमधील एकूण कार्यशैलीबाबत कृपाशंकर सिंह नाराज होते. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपती निमित्त कृपाशंकर सिंह यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. तसेच यावर्षी उद्धव ठाकरे यांनींही त्यांच्या घरच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतीच. 370 कलम हटवल्यानंतर यानिर्णयचे स्वागत त्यांनी केलं होतं.


उर्मिला मातोंडकरचाही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा


अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे. मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं आहे.



संबंधित बातम्या