मुंबई : विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी निवडणूक पूर्व आघाडी असल्याने मविआचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करण्याची शक्यता आहे.
निवडणूक पूर्व आघाडी असल्याचे पत्र महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना देणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पक्षनेते पद विधानसभेमध्ये असावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी महाविकास आघाडीची ही मागणी मान्य केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा संख्याबळानुसार विरोधी पक्ष नेता होऊ शकतो, असेही चिन्ह आहे.
विरोधी पक्षनेते पदी भास्कर जाधव की आदित्य ठाकरेंच्या नावाची वर्णी?
महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष 10 असे आहे. तर सभागृहाच्या एक दशांश म्हणजे एकूण 29 सदस्य एका पक्षाचे असणे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आहे. मात्र यामध्ये निवडणूक पूर्व आघाडी म्हणून महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्याने एकत्रित मिळून विरोधी पक्षनेते पद मिळाव यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीची विनंती मान्य झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरे या नावाची चर्चा विरोधी पक्षनेता म्हणून सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार
राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर 16 जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे.
राज्यातील संख्याबळ, कोणत्या पक्षाला किती जागा
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
हेही वाचा
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार