उत्तर गोवा लोकसभेसाठी 76.0 तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात 72.89 टक्के मतदान झाले. विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मांद्रे मतदारसंघात 81.61, शिरोडयात 80.09 तर म्हापसा येथे 75.17 टक्के मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. गोव्यात सरासरी 78.77 टक्के मतदान झाले.
2014 मध्ये लोकसभेसाठी राज्यात सरासरी 76.86 टक्के एवढे मतदान झाले होते. त्याच्याशी तुलना केल्यास 2019 च्या या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी कमी झाली आहे.
मांद्रे मतदारसंघात 2017 मध्ये 87.40 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत तेथील टक्केवारी घसरली असून ती 81.61 वर आली. शिरोड्यात 2017 मध्ये 85.78 टक्के इतके मतदान झाले होते. तर आता तेथील टक्केवारी घसरुन 80.09 वर पोहोचली.
म्हापसा येथे 2014 मध्ये 87.34 टक्के मतदान झाले होते तेथेही आता मतदानाची टक्केवारी 75.17 एवढी खाली आली. तिन्ही पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी 2017 च्या तुनलनेत बरीच खाली आल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेसाठी 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अपेक्षित वाढ न होता मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
लोकसभा मतदानासाठी विविध मतदान केंद्रात मिळून 10 बीयू (बॅलट युनिट), 10 सीयू (कंट्रोल युनिट), आणि 29 व्हीव्हीपीटी मशीन (यंत्रे) बदलण्यात आली. पोटनिवडणुकीसाठी मात्र एकही बीयू, सीयू बदलण्यात आले नाही तथापी 2 व्हीव्हीपीटी यंत्रे बदलण्यात आली.
मतदानासाठी वापरण्यात आलेली सर्व यंत्रे (ईव्हीएम) सरकारी पॉलिटेक्निक (पणजी), आणि मल्टी पर्पज हॉल (मडगाव) येथे ठेवण्यात आली असून त्याला सीसीटीव्ही कॅमेरासह दुहेरी सुरक्षा 24 तास पुरवण्यात आली आहे.