मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत पार्थ पवार हे बारामतीचे पार्सल असून त्यांना परत बारामतीला पाठवा असे पवार यांचे नाव न घेता टीका केली. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून यात माढा आणि बारामती हादरुन गेले आहे. आता मावळला धक्का देण्याची वेळ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यापलीकडे आघाडी सरकारने काहीही केले नाही. भाजप सरकारने उरी येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. अतिरेक्यांचे तळ सैन्याने उद्ध्वस्त केल्याचे जगाने मान्य केले, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाखिचडीला हे मान्य नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्वत:च्या जाहीरनाम्यात काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतेय आम्ही 124 कलम काढून टाकू, देशविरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे कलम काढून टाकण्यात यावे ही विरोधी पक्षाची मागणी आहे. अशा पक्षाला मतदान करणे योग्य आहे का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.