लोकसभा निकालाआधी राजकीय हालचालींना वेग, 24 तासात दुसऱ्यांदा चंद्राबाबू नायडू शरद पवार-राहुल गांधींना भेटले
विरोधकांची एकी झाली तर पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं नावंही पुढं येऊ शकतं. दुसरीकडे लोकसभेत भाजप 200 जागांचा टप्पा गाठू शकलं नाही, तर नितीन गडकरींचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होतील. मात्र निकालापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील 24 तासात टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. तसेच काल संध्याकाळी त्यांनी लखनौ येथे बीएसपी अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.
पंतप्रधानपदी मराठी माणूस?
या सगळ्या राजकीय घडमोडींमध्ये महाराष्ट्राली सुखावणारी चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस बसण्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर या चर्चांना तोंड फुटलं आहे. चंद्राबाबूंनी शरद पवारांच्या भेटीआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. जर विरोधकांची एकी झाली तर पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं नावंही पुढं येऊ शकतं. दुसरीकडे लोकसभेत भाजप 200 जागांचा टप्पा गाठू शकलं नाही, तर नितीन गडकरींचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कारण नितीन गडकरींच्या नावावर एनडीएतील घटक पक्षांचं एकमत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र चंद्राबाबूंसोबतच्या बैठकीत पंतप्रधान पदाबाबत काहीही चर्चा झाली नाही. आपापल्या राज्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत चर्चा झाल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
याआधी चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सीपीआय(एम) महासचिव सीताराम येचुरी आणि आपचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तसेच गेल्या आठवड्यात नायडू यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती.
एनडीएला 200 जागाही जिंकता येणार नाहीत
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 200 जागाही जिंकता येणार नाहीत. विरोधी पक्षाने मनावर घेतलं, तर एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टी (टीडीपी) याआधी एनडीएचा भाग होती. मात्र निवडणुकीच्या काही महिने आधी नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.