मुंबई : भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर, नरेंद्र मोदी 26 मे रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असं म्हटलं जात आहे. शपथविधीनंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवरचं नाव आहे, भाजप अध्यक्ष अमित शाह, जे गांधीनगर मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. अमित शाह यांना महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे. तर इतर मंत्र्यांना त्यांच्या कामाचं बक्षीस म्हणून प्रमोशन होऊन नवं खातं मिळू शकतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेत पहिल्यांदा पोहोचणाऱ्या अमित शाह यांचा, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत समावेश होऊ शकतो. सीसीएसमध्ये पंतप्रधानांसह, संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाचे चार वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो. म्हणजे अमित शाह यांना यापैकी एक मंत्री बून शकतात.

अमित शाह गृहमंत्री?
दरम्यान, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, अमित शाह त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यामुळे अमित शाह यांना केंद्र सरकारमध्ये गृहखातं दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे. पण मोदींच्या पहिल्या कार्यकाळात गृहमंत्री असलेले राजनाथ सिंह देखील यंदा लखनौमधून विजयी झाले आहेत. शिवाय ते पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.

गोयल यांची प्रगती!
राफेल करारातील घोटाळ्याच्या आरोपांनंतरही मंत्रालय यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांना पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालय मिळू शकतं. दुसरीकडे सरकारसाठी संकटमोचकाची भूमिका निभावणारे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना यंदा आणखी महत्त्वाचं खातं मिळू शकतं.

अरुण जेटली यांची प्रकृती चिंतेचा विषय
याशिवाय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंतेचा विषय आहे. त्यांना गुरुवारीच (23 मे) दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयात झालेल्या विजय उत्सवात सहभागी होऊ शकले नाही. आगामी काळात येणाऱ्या आर्थिक आव्हानं पाहता पक्षाला चिंता आहे की, अशावेळी जेटली अर्थ मंत्रालय सांभाळू शकतात का?

जेटली सुमारे तीन आठवड्यांपासून कार्यलयात जात नव्हते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बहुतांश वेळी ते रुग्णालयातच होते. यंदा 22 जानेवारीला शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेले होते. त्यामुळे ते मोदी सरकारच्या पहिल्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करु शकले नव्हते आणि ही जबाबदारी पियुष गोयल यांच्यावर सोपवली होती.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुषमा स्वराज सध्या लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्य नाहीत.

स्मृती इराणींना विजयाचं बक्षीस मिळणार?
वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात राहुल गांधींविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांना या विजयाचं बक्षीस मिळू शकतं. याशिवाय व्हीके सिंह यांनाही महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं. कारण ते गाझियाबादमधून दोन वेळा मताधिक्याने निवडून आले आहेत

अनेक वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिल्यानंतर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत. याआधीही त्यांनी महत्त्वाचं खातं सांभाळलं आहे. यंदाही त्यांना एखादं महत्त्वाचं खातं मिळू शकतं.