जालंधर : घरात नऊ सदस्यांनी मतदान केलं असतानाही, निव्वळ पाच मतं पडल्यामुळे रडणाऱ्या पंजाबमधील अपक्ष उमेदवाराबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार नीतू वाला यांना 856 मतं पडली आहेत. त्यामुळे वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तथ्य नसल्याचं दिसत आहे.

कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही, असं अनेक दिग्गज राजकारणी सांगतात. जालंधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नीतू वाला यांना याचा प्रत्यय आल्याचं सुरुवातीला वाटत होतं. घरात नऊ सदस्यांनी मतदान केलं असतानाही, आपल्याला निव्वळ पाच मतं पडली, असं सांगत वाला रडत होते.

आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी ते मतमोजणी केंद्रावर गेले. जोरदार प्रचार केल्यामुळे आपल्याला शेकड्याच्या घरात मतं मिळाली, की हजाराच्या, याची उत्सुकता नीतू यांच्या मनात होती. मात्र कोणास ठावूक त्यांना पाचच मतं मिळाल्याचं समजलं.

पाचच मतं मिळाल्याचं समजून हताश झालेल्या नीतू वाला यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हा मुद्दा धरुन प्रश्न विचारला होता. त्यावेळी कुटुंबीयांनी आपल्यासोबत गद्दारी केल्याची भावना बोलून दाखवत असतानाच त्यांना कॅमेरासमोरच अक्षरश: रडू कोसळलं. कुटुंबीयांना दोष देतानाच त्यांनी ईव्हीएमवरही खापर फोडलं. नीतू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

नीतू वाला यांना प्रत्यक्षात 856 मतं मिळाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कदाचित प्राथमिक फेरीतील हे कल समजल्यानंतर त्यांनी घाईघाईतच प्रतिक्रिया नोंदवली असावी.



लोकसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सत्ता दिली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजप आणि मित्रपक्षांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला.