नवी दिल्ली : भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाजपविरोधी विधानं करत आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं होत. याशिवाय लालू प्रसाद यादव आमचे मित्र असल्याचंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.


भाजपमध्ये नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा 'हात' धरणार आहेत. तसेच काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिबमधून ते लोकसभा निवडणूकही लढवण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील महाआघाडीला जोडण्यास शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा वाटा आहे.


बिहारमध्ये एनडीएच्या संभाव्य जागा घोषित झाल्या आहेत. पटना साहिबची जागेवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे. पटना साहिबमध्ये अंतिम टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे.


शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, जी आश्वासनं देण्यात आली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मी आशा करतो की लवकरच ती आश्वासनं पूर्ण होतील. पुढे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटलं की, ''मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में हम न होंगें."





शत्रुघ्न सिन्हा आणि लालू प्रसाद यादव यांची जवळीक लपलेली नाही. अनेकदा तेजस्वी यादव यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा गेल्या काही दिवसांपासून ते करत आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या जाण्याने भाजपला किती नुकसान होईल आणि काँग्रेसला किती फायदा होईल, हे येणारा काळच ठरवेल.