जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. त्यानंतर कोणता पक्ष जिंकणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल.
यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांचीही मोजणी होणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही दिलं आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.
पहाटे निकाल हाती येणार!
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1 याप्रमाणे 5 मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी अतिरिक्त पाच तास लागणार असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री 2 वाजतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
दरम्यान, काही तांत्रिक कारणावरुन उशीर झाला किंवा कोणी हरकत घेतली तर मतदानयंत्र निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात येईल आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.
निकाल येण्यास 14 ते 15 तासांचा अवधी लागणार
लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत.
ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल.
यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी. म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.
चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटच्या एका मशीनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
आधी पोस्टल मतांची मोजणी
सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ईटीपीबीएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा आणि प्रत्यक्ष मतपत्रिका यावरील बारकोड स्कॅन करुन मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी होते. एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएमची मोजणी केली जाते.
कशी होते मतमोजणी? EVM आणि VVPAT मधून असे निकाल जाहीर होणार
- यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडलं असून स्लिपची मोजणीही त्याच वेळी होणार आहे. प्रक्रियेनुसार सर्वात आधी EVM वरील CU (कंट्रोल यूनिट) च्या निकालाच्या बटणाने मोजणी होईल.
- यानंतर पाचही व्हीव्हीपॅटचे निकाल कंट्रोल यूनिटच्या आकड्यांशी जुळवले जातील.
- पिजन होल बॉक्समधील स्लिपच्या संख्येसोबतही मतांची संख्या जुळवली जाईल. मतदान करताना ईव्हीएमच्या उजव्या बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटमध्ये ही स्लिप दिसली असेल. या स्लिपची मोजणीही मतांच्या मोजणीसोबत झाली होती.