कोलकाता : ओदिशामध्ये तांडव केल्यानंतर फनी चक्रीवादळाने काल रात्री पश्चिम बंगालमध्ये धडक दिली. 115 किमी प्रतितास वेगाने हे वादळ बंगालच्या दिघा किनाऱ्यावर धडकले. वादळामुळे पश्चिम बंगालमध्येदेखील जोरदार पाऊस पडला. परंतु आज सकाळपासून हे वादळ प्रभावहीन ठरले. वादळाची तीव्रता कमी झाली असून दुपारपर्यंत हे वादळ बांग्लादेशमध्ये धडक देईल.


फनी वादळ काल सकाळी ओदिशात धडकले. ओदिशामध्ये किनारपट्टीलगतच्या भागात या वादळाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर संध्याकाळी हे वादळ पश्चिम बंगालकडे सरकले. पूर्व मिदिनापूर परिसरातील गावांमध्ये काही प्रमाणात घरांचे नुकसानही झाले. त्याचदरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हे वादळ खडगपूर आणि कोलकात्यामध्ये पोहोचले.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह 'फनी' चक्रवादळाने काल सकाळी ओदिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. या वादळामुळे ओदिशात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून पूर्व किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओदिशातील पूर्वेकडील 15 ते 16 जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मोबाईल नेटवर्क, वीजेसारख्या गरजेच्या सेवा ठप्प आहेत.

हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आपपासच्या राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास परवानगी नाकारली आहे. फनी चक्रीवादळाने सकाळी साधारण साडेआठ वाजण्याच्या सुमारास ओदिशामधील पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर धडक दिली. जोरदार पावसामुळे किनारपट्टीलगतच्या मोठ्या परिसरात पाणी साचले आहे. वादळाचा मोठा फटका बसलेल्या पूर्वेकडील गावांमध्य़े मदतकार्य सुरु आहे.