Lok Sabha Election Result 2024: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election Result 2024) निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या चुसरशीची लढत पाहायला मिळतेय. त्यातच भाजपच्या अनेक महत्त्वाच्या उमेदवारांची यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात पिछेहाट पाहायला मिळतेय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती.  


उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड मतदासंघातून राहुल गांधी निवडणूकीसाठी उभे राहिले होते. दुपारी 2 वाजताच्या मतमोजणीच्या आकडेवारीनूसार दोनही मतदारसंघात राहुल गांधी चांगल्या मताधिक्याने सध्या आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी 28 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. 


भाजपाच्या उमेदवारने मान्य केला पराभव-


रायबरेलीमध्ये भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये दिनेश प्रताप सिंह म्हणाले की, रायबरेलीच्या देवतुल्य लोकांची सेवा मोठ्या नम्रतेने आणि मेहनतीने केली. तरीही माझ्या सेवेदरम्यान माझ्या विचारात, शब्दात किंवा कृतीत काही चूक झाली असेल किंवा कुणाला त्रास झाला असेल तर आम्ही रायबरेलीच्या जनतेची माफी मागतो, असं दिनेश प्रताप सिंह यांनी सांगितले.


..तर राहुल गांधींना एक जागेवरुन माघार घ्यावी लागेल-


राहुल गांधींचा दोन्ही जागांवर विजय झाल्यास त्यांना रायबरेली किंवा वायनाड यापौकी एक जागा सोडावी लागणार आहे. राहुल गांधी रायबरेलीची जागा सोडू शकतात आणि रायबरेलीचा वारसा प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवू शकतात, अशीही चर्चा काँग्रेसच्या एका गटात सुरू आहे. पण अशा परिस्थितीत रायबरेलीची जनता काँग्रेस आणि गांधी घराण्याबद्दलची निष्ठा कायम ठेवणार की नाही, याचे अचूक उत्तर देता येणार नाही.


भाजपचे नुकसान किती?


आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजपला 250 चा आकडाही स्पर्श करता आलेला नाही. या कलांचे निकालात रुपांतर झाल्यास यावेळी भाजपला जवळपास 60 जागांचा फटका बसल्याचे दिसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होऊनही उत्तर प्रदेशात भाजप आणि एनडीएचे मोठे नुकसान झाले आहे. यूपीमधील 80 जागांपैकी भाजप 36 ते 40 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात.


युती वाचवण्याचे पहिले आव्हान 


भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा हात धरावा लागणार असल्याचे समोर येत असलेल्या निकाल आणि कलांवरून स्पष्ट झाले आहे. परंतु, युतीचे भागीदार हात झटकण्यात अजिबात उशीर करत नाहीत, हे वारे इंडिया आघाडीच्या दिशेने वाहू लागले, तर भाजपपुढे आपले युती वाचविण्याचे मोठे आव्हान असेल, हे राजकारणाचा इतिहास दाखवतो. काही वर्षांपूर्वी काँग्रेसबाबत असेच घडले होते. मात्र, भाजपची स्थिती काँग्रेससारखी वाईट नाही.