मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशातल्या 91 मतदारसंघात मतदान होणार असून, त्यात विदर्भातल्या सात मतदारसंघाचा समावेश आहे. नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात ठिकाणी मतदान होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ईव्हीएम आणि इतर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. यंदा सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचं सावट गडचिरोलीमधल्या निवडणुकांवरही आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त आणि संवेदनशील मतदारसंघात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय हंसराज अहिर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार सुरेश धानोरकर इत्यादी दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.
यंदाची निवडणूकही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच रंगणार आहे. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या आहेत. विदर्भासह देशभरातील जनतेचा कौल कोणाला याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.
विदर्भातील सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?
नागपूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरात 57.12 टक्के मतदान झालं होतं. 19 लाख मतदारांपैकी 10 लाख 85 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपच्या नितीन गडकरींना 5 लाख 87 हजार 767 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांना 3 लाख मतं मिळाली होती. गडकरी तब्बल 2 लाख 85 हजार मतांनी विजयी झाले होते.
भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदियात तब्बल 72.31 टक्के मतदान झालं होतं. 16.50 लाख मतदारांपैकी 11 लाख 97 हजार 398 मतदारांनी मतदान केलं. त्यावेळी भाजपकडून लढणाऱ्या नाना पटोलेंनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना दीड लाख मतांनी हरवलं होतं. पटोलेंना 6 लाख 6 हजार मतं मिळाली होती तर प्रफुल पटेलांना 4 लाख 56 हजार मतं मिळाली होती.
गडचिरोली-चिमूर : या मतदारसंघात 14 लाख 68 हजार मतदारांपैकी 70.04 टक्के म्हणजेचे 10 लाख 28 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपचे अशोक नेते यांनी काँगेसच्या नामदेव उसेंडी यांचा 2 लाख 35 हजार मतांनी हरवलं होतं.
चंद्रपूर : मतदारसंघात 63.29 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 53 हजारांपैकी 11 लाख मतदारांनी मतदानाचा हक्कं बजावला होता. भाजपचे हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा 2 लाख 36 हजार मतांनी पराभव केला होता.
यवतमाळ-वाशिम : 58.87 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 55 हजार मतदारांपैकी 10 लाख 33 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा 1 लाख 7 हजार मतांनी पराभव केला होता.
रामटेक : या मतदारसंघात 62.64 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 77 हजार मतदारांपैकी 10 लाख 50 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 19 हजार तर काँगेसच्या मुकुल वासनिक यांना 3 लाख 44 हजार मतं मिळाली होती.
वर्धा : या मतदार संघात 64.79 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 64 हजार मतदारांपैकी 10 लाख 13 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या रामदास तडस यांना 5 लाख 37 हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सागर मेघेंना 3 लाख 21 हजार मतं मिळाली होती. तडस 2 लाख 15 हजार मतांनी जिंकले होते.
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात, राज्यात सात जागांसाठी मतदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2019 11:51 PM (IST)
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या सातही जागा युतीने जिंकल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -