Karnataka Assembly Elections 2023: शेतकरी मुलाशी कुणीही लग्न करायला तयार होत नसल्याची परिस्थिती सगळीकडेच आहे. एकवेळ शिपाई किंवा शहरात हमाली करणारा मुलगा चालेल, पण शेतकरी मुलाशी लग्न करायला ग्रामीण भागातल्या मुलीही तयार होत नसल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचं सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपये देण्यात येतील असं कुमारस्वामी यांनी जाहीर केलं आहे. कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशा वेळी कुमारस्वामींनी ही घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना आपला पक्ष दोन लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी सोमवारी कोलार येथील पंचरत्न मेळाव्यात सांगितले. यावेळी कुमारस्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये द्यावेत.
कर्नाटक निवडणुकीच्या आधी, माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) नेते एचडी कुमारस्वामी यांनी जनतेला वचन दिलं आहे की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या वधूला दोन लाख रुपये दिले जातील.
शेतकऱ्याच्या मुलांची लग्नं होत नसल्याची व्यथा
या घोषणेमागील तर्क स्पष्ट करताना एचडी कुमारस्वामी म्हणाले, "आताच्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये द्यावेत. आमच्या पोरांच्या स्वाभिमानासाठी सुरू होणारा हा एक कार्यक्रम आहे."
कर्नाटक निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे.
दरम्यान, कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचं ओपिनियन पोलचा अंदाज आहे.
ही बातमी वाचा: