Nashik Unseasonal Rain: 'ढगाळ वातावरण झाल्याने पाऊस येणार अस समजताच जनावरांचा चारा पावसात भिजू नये म्हणून लगोलग शेतात गेले. मात्र वैरण झाकता न करताच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. अशातच मेघगर्जनेसह गारपिटीला सुरवात झाली. मात्र घरी येईपर्यंत गारांचा मार लागल्याने जखमी झाले, तसंच धावत पळत घर गाठले, असा अनुभव जनाबाई राथुर यांनी सांगितला. 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पेठ तालुक्यातील (Peth Taluka) अभेटी येथील जनाबाई राथुर कण्हत कण्हत त्या दिवसाच्या पावसाची आपबीती सांगितली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पेठ तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी चा फटका बसला आहे. अशातच हरसूल जवळील अभेटी गावात अक्षरशः गारांचा खच पाहायला मिळत असून गोळेच्या गोळे घरांमध्ये पडून आहेत. 


अभेटी येथील जनाबाई राथुर या महिला सोमवारी दुपारी घरापासून जवळपास दोनशे मीटर अंतरावर जनावरांचा चारा झाकण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू झाल्याने चारा न झाकताच त्यांनी जीव मुठीत धरून कसाबसा घरी पळ काढला. मात्र या दोनशे मीटरच्या अंतरावर त्यांना पडणाऱ्या गारांनी अक्षरश झोडपून काढले. तेव्हापासून जनाबाई या आजारी पडल्या असून घरात अंथरुणावर त्या झोपून आहेत. गारांचा मारा एवढा भयानक होता, की अजूनही डोक्यात वेदना होत असल्याचे जनाबाई यांनी सांगितले. 


तर याच सुमारास जनाबाई यांचे पती देखील शेताकडे कामानिमित्त गेले होते. मार त्याचवेळी सुरू झालेल्या गारपिटीमुळे त्यांचीही तारांबळ उडाली. अशावेळी घरी जाऊ की इथेच अशी त्यांची गत झाल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले पाऊस सुरू झाला, घराकडे निघालो मात्र गारपीट इतकी होत होती की पाऊस पडतोय की गारांचे गोळे पडताय हे समजत नव्हतं. त्यामुळे घरी न जाता पाणी वाहून नेणाऱ्या मोरीत लपून बसल्याचे ते म्हणाले. 


एका तासात 48 मिमीचा पाऊस, गारांमुळे पत्र्यांना छिद्रे


पेठ तालुक्याला सोमवारी वादळी वारा आणि गारपीटीचा मोठा तडाखा बसला असून एक तासातच 48 मिमी पाऊस कोसळला होता. तालुक्यातील अभेटी या गावासह परिसरातील शेकडो घरांची मोठी पडझड झाली असून घराच्या भिंती, छत कोसळली आहेत. पावसामुळे अनेकांचा संसार हा उघड्यावर आला आहे. गारांचा वेग इतका होता की गावातील स्वच्छतागुहाच्या दारांनाही मोठं मोठे छिद्र पडली आहेत.