Karnataka Election 2023: कर्नाटकासोबच्या (Karnataka) विधानसभेच्या निवडणुकांसोबतच चार राज्यांमधील काही जागांवर पोटनिवडणुकीसाठी (By Election) मतदान होणार आहे. ज्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)  तांडा आणि छानबे मतदारसंघातील  ओडिशातील (Odisha) झारसुगुडा मतदारसंघ, पंजाबमधील (Punjab) जालंधर लोकसभा आणि मेघालयमधील (Meghalaya) सोहिओंग या विधानसभा मतदार संघात निवडणूक होणार आहे.  या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान 10 मे रोजी होणार आहे. 


पंजाबमध्ये रंगतदार लढत 


पंजाबमधील जालंधर मंतदासंघाचे काँग्रेसचे संतोख सिंह चौधरी यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिकामी झाली आहे. या जागेवर काँग्रेसकडून संतोख सिंह चौधरी यांच्या पत्नी कर्मजीत चौधरी यांना पतीच्या पश्चात त्या जागेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून या जागेवर इंदर इकबाल सिंह अटवाल यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच सत्ताधारी पक्षाकडून आम आदमी पक्षाचे माजी आमदार सुशील कुमार रिंकु हे मैदानात आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाकडून विद्यमान आमदार डॉ.सुखविंदर सिंह सुक्खी आपलं नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे पंजाबमधील या राजकिय परिस्थितीचा विचार करता पंजाबमधील जालंधर मतदारसंघासाठीची ही पोटनिवडणूक चांगलीच रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि अपना दलमध्ये लढत


उत्तर प्रदेशातली रामपूर जिल्ह्यातील तांडा आणि मिर्जापुर जिल्ह्यातील छानबे या विधानसभा जागेवर सपा आणि अपना दल यांच्यात लढत होणार आहे. . स्वार तांडा जागेवर सपा नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच छांबे विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेले अपना दलचे राहुल कोल यांचे निधन झाले, त्यामुळे ही जागाही रिकामी झाली आहे. 


तांडा मतदारसंघातील जागेसाठी अपना दलकडून शफीर अहमद अंसारी तर समाजवादी पक्षाच्या अनुराधा चौहान, पीस पक्षाकडून डॉ.नाजिक सिद्दिकी यांच्यात लढत होणार आहे. तसेच छानबे मतदारसंघातील जागेसाठी अपना दलकडून दिवंगत आमदारच्या पत्नी रिंकी कोल यांना त्यांच्या पश्चात उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच रिंकी कोल यांचा सामना सपाच्या उमेदवार पिंकी कोल यांच्याशी होणार आहे. या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूका उत्तर प्रदेशात 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. 


ओडीशा 


ओडीशामध्ये बीजेडी (बीजू जनता दल) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ओडिशाच्या झारसुगुडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. बीजेडीकडून दीपाली दास, भाजपचे तनखाधर त्रिपाठी यांच्यात लढत आहे.  तर काँग्रेसचे तरुण पांडेही या निवडणूकीच्या रिंगणात आहेत.  या जागेचे प्रतिनिधित्व माजी आरोग्य मंत्री नब किशोर दास यांनी केले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ही जागा रिकामी झाली. या जागेसाठी बीजेडीचे दिवंगत मंत्री नब किशोर दास यांची मुलगी दिपाली दास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


मेघालय


मेघालयात एच.डोनकुपर रॉय लिंगदोह यांच्या निधनानंतर सोहियोंग विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.