जालना : जिल्ह्यात विधानसभेचे एकूण जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, असे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत.2019 साली जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभेवर भाजपचे वर्चस्व राहिले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपचा या मतदारसंघावर वरचस्मा राहिला. जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपला विधानसभेची जागा बळकावण्याएवढी ताकत निर्माण करता आली नाही. परंपरेने या दोन मतदारसंघात नेतृत्व करताना शिवसेनेने जम बसवला. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात राजकीय समीकरणं बदलली. मराठवाड्यातील शिवसेनेचे बलाढ्य नेते अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदेंची सोबत दिल्याने सर्वच मतदासंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला.
मनोज जरांगे यांच्यामुळे राजकीय गणित बदलले
राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फुटीनंतर राज्याच्या राजकारणात प्रभाव असलेले नेते राजेश टोपे यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीचे फारसे परिणाम झाले नाही. राजेश टोपे नेतृत्व करत असलेला घनसावंगी मतदासंघ टोपेंचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर राजेश टोपे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र यावेळी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात याच मतदारसंघातून मराठा आंदोलन उभे राहिल्यानंतर येथील राजकीय समीकरणावर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. याच मतदारसंघांमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे देखील घनसावंगी मतदारसंघ बरोबरच जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा प्रभाव
29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मोठं जनआंदोलन उभं केलं. या आंदोलनातील मागण्या आणि नंतर उद्भवलेल्या हिंसक घटनांचा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर परिणाम झाला. या परिणामांचा प्रभाव जिल्ह्यातील सर्वच मतदासंघांवर झाला. जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा यासाठी अनेकजण राजकीय डावपेच आखत आहेत. दुसरीकडे जरांगेंच्या या मागणीला विरोध करत 13 जून 2024 रोजी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी आंदोलन उभे राहिले आहे. यालादेखील राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामी जालना जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. याचाही परिणाम या विधानसभा निवडणुकीवर झालेला पाहायला मिळेल.
जालना जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? (Jalna MLA List)
परतूर विधानसभा - बबन लोणीकर (भाजप)
घनसावंगी विधानसभा - राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
जालना विधानसभा - कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
बदनापूर विधानसभा - नारायण कुचे (भाजप)
भोकरदन विधानसभा - संतोष दानवे (भाजप)
कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली?
जालना विधानसभा मतदारसंघ :
जालना विधानसभा मतदारसंघात 2019 साली काँग्रेसचे उणेदवार कैलास गोरंट्याल यांचा विजय झाला होता. त्यांना एकूण 49.3 टक्के मतं मिलाली होती. तर शिवसेना (अविभाजित) पक्षाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यांना एकूण 35.7 टक्के मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे अशोक खरात हे तिसऱ्या क्रमांकावर होते. कैलास गोरंट्याल यांना 91835 मतं तर खोतकर यांना 66497 मतं मिळाली होती. अशोक खरात यांना 8336 मतं मिळाली होती.
परतूर विधानसभा मतदारसंघ :
2019 साली या मतदारसंघात बबनराव लोणीकर यांचा विजय झाला होता. ते भाजपाचे उमेदवार होते. त्यांना एकूण 52.2 टक्के मतं मिळाली होती. तर सुरेशकुमार जेथिलिया यांना दसऱ्या क्रमांकाची 39.5 टक्के मतं मिळाली होती. लोणीकर यांना 106321 तर जेथिलिया यांना 80379 मतं मिळाली होती. जेथिलिया हे काँग्रेसचे उमेदवार होते.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ :
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून 2019 साली राष्ट्रवादीचे (अविभाजित) उमेदवार राजेश टोपे यांनी बाजी मारली होती. तर शिवसेनेचे (अविभाजित) हिकमत उढाण यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. टोपे यांना 107849 (47.1 टक्के) तर उढाण यांना 104440 (45.6 टक्के) मतं मिळाली होती.
बदनापूर विधानसभा मतदारसंघ
2019 साली बदनापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने बाजी मारली होती. या मतदारसंघात नारायण कुचे यांना 49.8 टक्के तर राष्ट्रवादीचे (अविभाजित) रुपकुमार चौधरी यांना 41 टक्के मतं मिळाली होती. या दोघांनाह मिळालेल्या मतांची संख्या अनुक्रमे 105312 आणि 86700 होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुज आघाडीचे राजेंद्र मगरे हे होते.
भोकरदन विधानसभा मतदारसंघ
भोकरदन विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे उमेदवार संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 118539 मतं मिळाली होती. या मतांचे प्रमाण 54.6 टक्के होते. तर चंद्रकांत दानवे या राष्ट्रवादीच्या (अविभाजित) उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची 86049 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण 39.7 टक्के होते.
सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आमदार? (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)
महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
हेही वाचा :
Marathwada MLA List : मराठवाड्यात कोणाची किती ताकद, कोणत्या पक्षाचे किती आमदार? जाणून घ्या सविस्तर