मुंबई :  विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Election) आज बिगुल वाजणार आहे.  आज दुपारी साडेतीन वाजता आयोगाची पत्रकार परिषद  होणार आहे. या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांमध्ये घडामोडींन वेग आला आहे.  दरम्यान शिवसेना नेते आणि  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मराठा आंदोलक  मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.  त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. 


मध्यरात्री अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती आहे.  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे.  भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही. मनोज जरांगे यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यात उलथापालथ करण्याचे आवाहन मेळाव्याला संबोधित करताना केले. तसेच आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या रात्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मनोज जरांगेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


मनोज जरांगेंची भेट घेतली कारण, उदय सामंत म्हणाले...


मनोज जरांगे यांच्या भेटीवर बोलताना उदय सामंत म्हणाले,   मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो. घनसावंगीवरून येताना मला सरपंचांनी सांगितलं की, मनोज जरांगेही या ठिकाणी मुक्कामी आहे.  म्हणून मी जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलो आहे.  


निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता


संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. निवडणुकांच्या आज तारखा जाहीर झाल्यावर लगेच आचारसंहिताही लागू होणार आहे.  26 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अगोदर निवडणुका पार पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर दिवाळी, छटपूजेनंतर लगेचच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. दरम्यान राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.