जळगाव: ज्यांनी गुजरात जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील (CR Patil Gujarat BJP President) यांच्या कन्या आता जळगावातील निवडणुकीत उतरल्या आहेत. भाविनी पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनल उभे केले आहे. त्यामुळे गुजरात जिंकणाऱ्या वडिलांची परंपरा कायम राखत मुलगी आता मोहाडीच्या निवडणुकीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Jalgaon Gram Panchayat Election: या आधी संरपंच म्हणून काम 


नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मूळचे जळगावचे असणाऱ्या सीआर पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला. आता त्यांच्या कन्या असलेल्या भाविनी पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील मोहाडी गावात आपले ग्राम विकास पॅनेल उभं केलं आहे. 


या आधी भाविनी पाटील यांनी मोहाडी गावच्या सरपंच म्हणून कारभार पाहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदावर मागासवर्गीय आरक्षण राखीव असल्याने त्यांना संधी मिळाली नाही. असं असलं तरी त्यांनी स्वत:चं पॅनेल उभं केलं आहे. आपल्या काळात गावात केलेल्या विकास कामांचा संदर्भ देत त्यांनी मतदारांच्या मते देण्याचं आवाहन करत असल्याचं दिसून येतंय. 


मात्र स्थानिक पातळीवर गावातील शरद पाटील यांनी भाविन पाटील यांच्या विरोधात लोकशाही ग्राम उन्नती पॅनल उभे केलं असून त्या माध्यमातून त्यांच्यापुढे कडवं आव्हान उभं केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रविवारी होत असलेल्या निवडणुकीत भाविनी पाटील यांच्या पॅनेलला मोहाडीकर पुन्हा साथ देणार की शरद पाटील यांच्या पॅनेलसोबत राहणार हे स्पष्ट होईल. 


सीआर पाटलांनी गुजरातचं मैदान मारलं आणि नवा विक्रम केला. आता त्यांच्या कन्या असलेल्या भाविनी पाटील या जळगावातील मोहाडीचं मैदान मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Gujarat BJP President CR Patil: कोण आहेत सीआर पाटील? 


सीआर पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून गुजरात निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचे ते शिल्पकार आहेत. सन 2017 साली साली भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या, त्याच जागा आता 150 पेक्षा जास्त झाल्या आहेत. 2017 साली भाजपला 49 टक्के मते होती, यंदा भाजपला 53 टक्के मते मिळाली.


सन 1980 साली सीआर पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. सुमारे 25 वर्षे पक्षाचं काम केल्यानंतर त्यांना औद्योगिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. 2009 साली ते नवासरीचे खासदार बनले. 2014 आणि 2019 सालच्या निवडणुकीतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 


सुमारे 15 वर्षांच्या सत्तेनंतर सीआर पाटील यांनी गुजरातमधल्या पक्षसंघटनेची जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि तिथूनच सुरु झाली 'अब की बार, 150 पार'ची तयारी. 2020 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आठही जागांवर भाजपने विजय मिळवला त्यानंतर राज्यसभेची निवडणुकही बिनविरोध करुन दाखवली. त्यानंतरच्या 31 जिल्हा परिषदा, 205 तालुका पंचायती आणि 75 नगरपालिका काबीज केल्या.